लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील मुंडीपार शेतकरी युवक संदीप राजेंद्र सरजारे (वय २६) याने सोमवारी (दि. १४) दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातीलच राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या पाण्याच्या टाकीवरून चढून शेतात जाणारा पाणंद रस्ता करून देण्याच्या मागणीला घेऊन वीरुगिरी केली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तहसीलदारांनी त्याची मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संदीपने पाण्याच्या टाकीवरून खाली उतरत आंदोलन मागे घेतले. प्राप्त माहितीनुसात मुंडीपार येथील शेतकरी यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ते शेतात जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्यात यावा यासाठी मागील पाच वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीची कामे कशी करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा संबंधित विभागाकडे न्याय मागूनही न्याय न मिळाल्याने या प्रकाराने संतापलेल्या संदीपने सोमवारी (दि. १४) गावातीलच पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत पाणी टाकीवरून खाली उतरणार नाही, असा पवित्रा संदीपने घेतला होता. यातच आठ तासांचा अल्टिमेटम देत, आठ तासांच्या आत न्याय न मिळाल्यास पाणी टाकीवरून उडी घेणार, असा इशारा प्रशासनाला दिला होता. या घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे तहसीलदार सचिन गोसावी, पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक घटनास्थळी दाखल. त्यांनी संदीपला पाणी टाकीवरून खाली उतरण्याची विनंती केली; पण जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाहीे तोपर्यंत पाणी टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका संदीपने घेतली होती. यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
संदीपच्या वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मुंडीपार येथील सहा शेतकऱ्यांच्या विरोधात संदीपच्या वडिलाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे; पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. मागील पाच वर्षांपासून शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्रस्त झालेल्या संदीपला अखेर संतापून आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे पाणंद रस्त्याच्या न्याय मागणीसाठी संदीप पाण्याच्या टाकीवर चढला होता. याची दखल तालुका प्रशासनाने घेतल्यानंतर संदीपला पाण्याच्या टाकीवरून उतरण्याची विनंती करण्यात आली. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर पोहोचून जागेची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदारांनी संदीपला लवकरच शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्याची व्यवस्था करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर संदीप पाण्याच्या टाकीवरून खाली उतरला. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.