कपिल केकत/गोंदिया : डीजेसाठी वाहनात बदल करणे (मोडीफाय) वाहनचालकाला चांगलेच महागात पडले. गंगाझरी पोलिसांच्या कारवाईवरून वाहनमालकाला उपप्रादेशिक परिवहन विभागाने १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कैलास लालचंद शेंडे (रा. दुर्गा चौक, गंगाझरी) याने त्याच्याकडे असलेल्या वाहनात डीजे बसविण्यासाठी बदल करून त्यात मोठ्या प्रमाणात डीजे सिस्टिम बसवून घेतले. असे करताना त्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाची परवानगी घेतली नाही. ही बाब गंगाझरी पोलिसांच्या लक्षात आल्याने त्यांनी बुधवारी (दि. १४) मोटार वाहन कायदा कलम २०७ प्रमाणे वाहन अधिग्रहित करून ठेवले होते. तसेच या प्रकारात वाहन व वाहन मालकावर दंडात्मक कारवाई होण्याकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.
पोलिस कारवाईची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून त्या डीजे वाहनावर १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात गंगाझरी ठाणेदार व शहर पोलिस अधिकारी-अंमलदारांनी केली आहे.
डीजे वाहनावरील ही दुसरी कारवाई
- मध्यंतरी डुग्गीपार पोलिसांनी अशाच प्रकारे डीजेसाठी वाहनात आपल्याच मर्जीने व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीशिवाय बदल केलेल्या वाहनावर कारवाई केली होती. त्यानंतर आता परत एकदा डिजेसाठी बदल करण्यात आलेल्या वाहनावरील कारवाईचे हे दुसरे प्रकरण दिसून येत आहे.