गोंदिया : रस्ता सुरक्षा, ध्वनी व हवा प्रदूषणाचे नियंत्रण व या संबंधात ठरवून दिलेल्या मानकांचा ज्यांच्यामुळे भंग होत असेल असे मोटर वाहन कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी चालविणाऱ्या किंवा चालवायला लावणाऱ्या किंवा चालवायची मुभा देणाऱ्या व्यक्तीला दंडाची शिक्षा देण्याची मोटारवाहन कायद्यात तरतूद आहे. असे असतानाही वाहतूक नियंत्रण शाखेकडून अशा वाहन चालकांवर मागील वर्षात काहीच कारवाया झालेल्या नाही. परिणामी कर्णकर्कश हॉर्न व फटाकेदार सायलेन्सर असलेले वाहनचालक अतिरेक करीत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजाचे हॉर्न वाजवून किंवा सायलेन्ससरद्वरे फटाके फोडून लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे एक फॅशन झाली आहे. मात्र याचा सर्वसामान्यांना त्रास होत आहे.
विशेष म्हणजे, कोरोना काळातील सर्वसामान्यांची अडचण लक्षात घेत वाहतूक नियंत्रण शाखेने याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता हीच बाब डोकेदुखीची ठरत असल्याने वाहतूक नियंत्रण शाखाही आता अशांना दणका देण्याच्या तयारीत आहे. वाहन नागरिकांच्या सुविधेसाठी असताना काही गैरजबाबदारांकडून त्यांचा अन्य नागरिकांना त्रास देण्यासाठी वापर होत आहे. ही बाब योग्य नसल्याने शहरातील असे बहाद्दर आता वाहतूक नियंत्रण शाखेच्या टार्गेटवर आहेत.
-------------------------
कर्णककर्श हॉर्न लावून आकर्षित करण्याचा प्रयत्न
आपल्या वाहनाला मोठ्या आवाजाचे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न लावून ते रस्त्यावर वाजवून अन्य लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे फॅड आजच्या तरुणांना लागले आहे. तर बुलेटचे सायलेन्सर सेट करून त्याद्वारे फटाके फोडून वाहन चालविण्यात तरुणांना आनंद येत आहे. हा लोकांना त्रास देण्याचा प्रकार आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून अशांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र कोरोना काळात मागील वर्षी शिथिलता देत अशा कारवाया न केल्याने अशा वाहनधारकांना रान मोकळे झाले आहे.
---------------------------
मागील वर्षात कारवाई नाही
कोरोनामुळे मागील अख्खे वर्ष कठीण गेले. अशात नागरिकांना त्रास होऊ नये या दृष्टीने काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. परिणामी कर्णककर्श हॉर्न व फटाके फोडणारे सायलेन्सर असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली नाही. मात्र आता अशांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. करिता वाहतूक नियंत्रण शाखेकडून तयारी केली जात आहे.
---------------------------
मोवाका १९० (२) दंडाची तरतूद
मोटार वाहन कायद्यांतर्गत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या या कर्णकर्कश हॉन व फटाके फोडणाऱ्या सायलेन्सर असलेल्या वाहनचालकांवर कलम १९० (२) अंतर्गत १ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. तर दुसऱ्यांदा व त्यानंतर २ हजार रुपये शिक्षा करण्याची तरतूद आहे. त्यादृष्टीने आता वाहतूक नियंत्रण शाखेने पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला आहे. आता त्यांचे आदेश येताच मोहीम सुरू केली जाणार आहे.
---------------------------
कर्णकर्कश हॉर्न व फटाके फोडणारे सायलेन्सर लावून वाहन चालविणाऱ्यांचा त्रास वाढत आहे. यामुळे आता उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक नियंत्रण शाखा संयुक्तरित्या मोहीम राबविणार आहे. याबाबत बोलणे झाले आहे. आता पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला असून त्यांचे आदेश आल्यावर मोहीम सुरू करणार आहोत.
- दिनेश तायडे
निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया.
----------------------------