अंकुश गुंडावारगोंदिया : गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पुर्णपणे ढासळले आहे. याच प्रकाराला कंटाळून गुरुवारी (दि.२०) सकाळी नवेगावबांध (देवलगाव) रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर उतरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर गुरुवारी बल्लारशाहून गोंदियाकडे सकाळी येणारी गाडी तब्बल पाच तास उशीराने हिरडामाली रेल्वे स्थानकावर रात्री ७: ३० वाजता पोहचली. दरम्यान लोकोपायलटने या रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढे नेण्यास नकार दिल्याने पेच निर्माण झाला होता.
रेल्वे गाड्यांना दररोज विलंब होत आहे. मालगाड्यांसाठी प्रवासी गाड्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे या प्रकाराने आता प्रवाशांसह लोकाेपायलट सुध्दा त्रस्त झाले असल्याचा अनुभव गुरुवारी जिल्हावासीयांना आला. बल्लारशाहून गोंदियाला येणारी पँसेजर गाडी ही तब्बल पाच तास उशीराने धावली. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागला.
दरम्यान गाडी हिरडामाली रेल्वे स्थानकावर रात्री ७.३० वाजताच्या सुमारास पोहचल्यानंतर त्या ठिकाणी एक तास उभी ठेवण्यात आली. त्यानंतर गाडीच्या लोकोपायलटने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. तो आपल्या मागणीवर अडून बसला होता. त्यामुळे प्रवाशांना हिरडामाली स्थानकावर मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुध्दा लोकाेपायलटची समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लोकोपायलट तयार झाला. ही गाडी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहचली.