गोंदिया : महाराष्ट्र सरकारचा धिक्कार नोंदवित विदर्भ राज्य आंदोलन समिती, गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने नागपूर कराराच्या प्रतिकात्मक प्रतींची होळी करून स्थानिक जयस्तंभ चौकात बुधवारी (दि.२८) निषेध नोंदविण्यात आला. यावेळी विदर्भवाद्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
२८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर करार करण्यात आला. त्याच आधारे १९६० मध्ये विदर्भ विलीन करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. तेव्हापासूनच विदर्भावर अन्याय सुरू आहे. विदर्भातील वीज, पाणी, कोळसा, खनिज, लोखंडासह २३ प्रकारच्या खनिज संपत्तीचे दोहन करीत पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करण्यात आले. या विरोधात विदर्भवाद्यांकडून २८ सप्टेंबर हा काळा दिवस पाळला जातो. यावर्षी हे आंदोलन ११ जिल्ह्यांत, १२० तालुक्यांत नागपूर कराराची होळी करून करण्यात आले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर, प्रशासकीय भवनसमोर, नागपूर येथे कराराची होळी करण्यात आली. याप्रसंगी गोंदिया जिल्हा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे वरिष्ठ वसंत गवळी, समन्वयक अतुल सतदेवे, सुनील भोंगाड़े, रवी भांडारकर, खोब्रागडे, युवराज उपराडे, शुभम आहाके व विदर्भवादी उपस्थित होते.
'हे' होते नागपूर करारात
नागपूर करारानुसार विदर्भातील तरुणांना २३ टक्के सरकारी नोकऱ्या, राज्याच्या तिजोरीतील २३ टक्के वाटा, सिंचनासाठी ७५ हज़ार कोटी देऊ केले; परंतु प्रत्यक्षात ते दिले नाही. या उलट येथील निसर्गसंपदा लुटून नेली. ६९ वर्षांपासून सुरू असणाऱ्या या लुटीचा नागपूर कराराची होळी करून निषेध नोंदविला गेला.