गोंदिया : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या (बीआरएसपी) वतीने सावित्रीबाई फुले जयंती ते जिजाऊ माता जयंतीपर्यंत विदर्भ संघर्ष यात्रेचे संपूर्ण विदर्भात भ्रमण होत आहे. याच श्रृंखलेत यात्रेचे आगमन गोंदिया जिल्ह्यात ७ व ८ जानेवारी रोजी होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती, शेतकऱ्यांना ६० वर्षांनंतर चार हजार रूपये मासीक पेंशन, खासगीकरणात एससी, एसटी, ओबीसी यांना आरक्षण, ओबीसी जनगणना, पेसा कायदा अंमलबजावणी व वनवासी शब्दावर कायमची बंदी, मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण, शेतकरी आत्महत्या-दलित व आदिवासींवर होणाऱ्या अन्यायास प्रतिबंध, बहुजन विद्यार्थी विरोधी धोरणाचा निषेध, आरक्षणविरोधी पक्ष, नेते, संघटनेच्या निषेधार्थ या विषयांच्या अनुषंगाने जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही यात्रा सदर विषयांना धरून काढण्यात आली आहे. यात्रेचे आगमन ७ जानेवारीला सकाळी ११ वाजता सडक-अर्जुनी येथे होईल. गोरेगाव दुपारी १ वाजता, तिरोडा (एकोडी) दुपारी ३ वाजता, गोंदिया येथील मैत्रीय बुद्ध विहार येथे सांयकाळी ५.३० वाजता, कव्वाली मैदान गोविंदपूर येथे सायंकाळी ७.३० वाजता होत आहे. ८ जानेवारीला सकाळी ११ वाजता ठाणा, दुपारी १२ वाजता आमगाव, ३ वाजता सालेकसा, साखरीटोला येथे ५ वाजता, देवरी येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे. दुसऱ्या दिवशी यात्रा गडचिरोलीसाठी रवाना होईल. सदर विदर्भ संघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पक्षाचे जिल्हा प्रभारी सुधा शिवणकर, अध्यक्ष प्यारेलाल जांभूळकर, सचिव अतुल सतदेवे यांनी केले आहे.
विदर्भ संघर्ष यात्रा आज व उद्या जिल्ह्यात
By admin | Published: January 07, 2016 2:27 AM