गोंदिया : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु त्याकडे राजकीय मंडळी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी लोहशाही मार्गाने माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य आघाडी विविध आंदोलनांसह विदर्भात जनजागृती करीत आहेत. आता विविध पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हाध्यक्ष छैलबिहारी अग्रवाल यांनी दिली. विदर्भ राज्य आघाडीची रविवारी विशेष सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आघाडीचे मुख्य संघटक नरेंद्र पालांदूरकर होते. या वेळी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पथनाट्य व पथसभा घेवून आठही तालुक्यांत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात १८ सप्टेंबरला तिरोडा व २५ सप्टेंबरला आमगाव तालुक्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संचालन राजेश बन्सोड यांनी केले. आभार रमेश कठाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विदर्भ राज्य आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.सभेत प्रकाश अरोरा, राम पुरोहित, रमेश ढोमणे, जगन्नाथ पारधी, गुरमित चावला, धर्मेश शेंडे, रवी भालाधरे, प्रफुल बन्सोड, राहुल ठाकूर, सुनील डोंगरे, शुभम कापसे, रोशन कावडे, निशिकांत पंचभाई, राजा करियार, कुलदीप भगत, बलदेव सोनवाने, राजन भगत, विजय बळगुजर, अब्दुल कुरेशी, शिल्पा मेश्राम, लता मानकर, मिनाक्षी खटवानी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)
पथनाट्यातून करणार विदर्भाची जनजागृती
By admin | Published: September 14, 2016 12:27 AM