Video: गावकऱ्यांनी आमदारांची गाडी रोखली; मुर्दाबादच्याही घोषणा; माघारी फिरला नेता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 02:24 PM2023-09-06T14:24:19+5:302023-09-06T14:25:56+5:30
तालुक्यातील ग्राम पांढरवाणी येथे बाघ पाटबंधारे विभागाकडून सुमारे दोन कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीतून उपसा सिंचन योजना उभारण्यात येत आहे.
गोंदिया : तालुक्यातील ग्राम पांढरवाणी येथे अपूर्ण असलेल्या उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी आलेल्या आमदार सहसराम कोरोटे यांना गावकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून उद्घाटन कार्यक्रम आणि आमदार कोरोटे यांचा निषेध दर्शविला. उद्घाटन करण्याच्या लगीनघाईमुळे आमदार कोरोटे पुन्हा चर्चेत आले आहेत. गावकऱ्यांनी गावच्या रस्त्यावरच त्यांची गाडी अडवत घोषणाबाजी केली. त्यामुळे, आमदार महोदयांवर तेथून माघारी फिरण्याची नामुष्की आली.
तालुक्यातील ग्राम पांढरवाणी येथे बाघ पाटबंधारे विभागाकडून सुमारे दोन कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीतून उपसा सिंचन योजना उभारण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेचे ३५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. यातून परिसरातील फक्त ३० टक्के शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. अर्थात उर्वरित ७० टक्के शेतकऱ्यांना या योजनेचे काम पूर्ण झाल्यावर लाभ घेता येईल, अशात आमदारांनी आधी काम पूर्ण होऊ द्यावे आणि नंतर उद्घाटन करणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ श्रेय घेण्यासाठी या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी आमदार कोरोटे पोहोचले. मात्र, याची माहिती ना ग्रामपंचायत सरपंचांना, ना ग्रामस्थांना, ना संबंधित विभागाला होती.
अशा परिस्थितीत आमदार फक्त श्रेय घेण्यासाठीच उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यामुळे आमदार कोरोटे यांना काळे झेंडे दाखवून थांबवण्यात आले. यावेळी, गावकऱ्यांनी घोषणाबाजी करत आमदारांची गाडी पुढेच येऊ दिली नाही. त्यामुळे, आमदार महोदयांवर परत फिरण्याची नामुष्की आली. यापूर्वी देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होत नसतानाही ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन केल्याचा आरोप माजी आमदार संजय पुराम यांनी केला आहे. दरम्यान, यासंदर्भात आमदार कोरोटे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पांढरवाणीच्या लिफ्ट एरिगेशनचे काम सध्या केवळ ३५ टक्के पूर्ण झाले असून, मोजक्या शेतकऱ्यांनाच यामाध्यमातून पाणी मिळत आहे. या योजनेचे लोकार्पण करण्यासाठी आ. कोरोटे यांनी घाई का केली. उद्घाटन करण्यासाठी संबंधित विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ कोणाशीही चर्चा न करता आपल्या मर्जीने रात्रभरात निमंत्रण पत्रिका छापून सोमवारी (दि. ४] सायंकाळी थेट उद्घाटन करायला आले. यावेळी लोकांनी आधी काम पूर्ण करा, मग उद्घाटन करा, असा आग्रह केला. परंतु आ. कोरोटे यांनी लोकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, त्यामुळे लोकांनी काळे झेंडे दाखवले.
संजू उईके, सरपंच, पांढरवाणी ग्रामपंचायत
पांढरवाणी येथे उपसा जलसिंचन योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर असून, काम पूर्ण झाले नाही. अशात आमदार कोरोटे यांना श्रेय घेण्याची सवय झाल्याने ते नेहमीप्रमाणे येथेही उद्घाटन करायला पोहोचले. याचा स्थानिक लोकांनी विरोध केला. निव्वळ श्रेय लाटण्यासाठी भूमिपूजन व लोकार्पण होता कामा नये.
संजय पुराम, माजी आमदार, आमगा देवरी