लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्यातील सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय वानखेडे यांनी सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत सर्वाधिक ८९२ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. केवळ दोन वर्षाच्या कालावधीत ८९२ पुरूष नसबंदी करणारे देशातील पहिले वैद्यकीय अधिकारी ठरले आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकार्डला करण्यात आली असून नुकतेच त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.केंद्र व राज्य सरकारतर्फे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि छोटे कुटुंब सुखी कुटुंब हा नारा देत व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात आहे.यासाठी विवाहीत पुरूषांना सुध्दा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहीत केले जात आहे.गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील आदिवासी व दुर्गम भागात डॉ.वानखेडे यांनी व्यापक जनजागृती मोहीम आणि समुपदेशन करुन ८९२ पुरूषांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहीत केले. त्यांच्या या प्रयत्नाना यश आले. २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षात त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधीक पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया केल्या. त्यांच्या कार्याची दखल घेत नवी दिल्ली येथे आयोजित पुरुष नसबंदी कार्यशाळेत केंद्रीय सहसचिव डॉ. वंदना गुरुनानी, उपायुक्त डॉ.सिकंदर, सहसंचालक डॉ. दिग्गीकर यांच्या उपस्थितीत सहसंचालक डॉ.एन.डी. देशमुख यांनी डॉ.वानखेडे यांच्या वतीने स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र स्विकारले. यासाठी यापूर्वी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार व डॉ. राजा दयानिधी, माजी जि.प.अध्यक्षा उषा मेंढे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. विशेष म्हणजे वानखेडे यांची आई तुळसा वानखेडे या सुध्दा सालेकसा तालुक्यातील सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक पदावर कार्यरत होते. वानखेडे यांनी आपल्या यशाचे श्रेय तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, डॉ.पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, डॉ.गहलोत व सर्व सहकारी आरोग्य कर्मचारी यांना दिले आहे.
विजय वानखेडे यांनी नोंदविला विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 8:52 PM
सालेकसा तालुक्यातील सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय वानखेडे यांनी सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत सर्वाधिक ८९२ पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केल्या.
ठळक मुद्देसर्वाधिक ८९२ पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची नोंद : इंडिया बुक आॅफ रेकार्डने घेतली दखल