गोंदिया : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत २२ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान गाव कृती आराखडा पंधरवाडा अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये गावपातळीवर नळ जोडणीचा गाव कृती आराखडा तयार करण्यात येईल. या पंधरवडा अभियानात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर सर्वांनी सहभाग घेऊन पंधरवाडा अभियान यशस्वीरीत्या राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे
अभियानांतर्गत, गुरुवारी (दि.२२) जल जीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर, तसेच जिल्हा कक्षाच्या सल्लागारांना ऑनलाइन गाव कृती आराखड्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये गाव कृती आराखड्यामधील माहितीचे संकलन, राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलद्वारे माहिती अपलोडबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (दि.२३) दुपारी २ ते ५ वाजता या कालावधीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, जिल्हा कक्षातील सल्लागार व तालुकास्तरावरील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयकांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे
यानंतर तालुका पातळीवर गट विकास अधिकारी २८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करतील. यामध्ये गाव कृती आराखडा बाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधींना ऑनलाइन प्रशिक्षण देतील. गावपातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गाव कृती आराखड्याच्या अनुषंगाने लागणारी माहिती कोबो टूल साधनाचा वापर करून संकलित करण्यात येईल. ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरून जिल्हा कृती आराखडाची निर्मिती व गाव कृती आराखडा पडताळणी प्रक्रिया करण्यात येऊन १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यात येणार आहे.
गाव कृती आराखडा पंधरवड्यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार, तालुका पातळीवरील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घेऊन गाव कृती आराखडा अभियान यशस्वीरीत्या राबविण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजकुमार पुराम, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) हितेंद्र चव्हाण यांनी केले आहे.