केशोरी : राज्यशासनाने ग्रामीण भागातील झगडे, भांडण गावातच सामोपचाराने सोडविण्यात यावे या चांगल्या उद्देशाकरिता तत्कालीन गृहराज्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या गाव तंटामुक्त समित्या प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर निर्माण करण्यात आल्या होत्या. गाव तंटामुक्त समित्यांचे चांगले रिझल्ट नागरिकांनी अनुभवले आहेत. परंतु अलीकडच्या काळात शासनाच्या उदासीन धोरणामुळे या गाव तंटामुक्त समित्या गायब झाल्याचे चित्र दिसू लागली आहे.
गावातील तंटे, भांडण गावातच सामोपचाराने मिटवून गावाला शांततेकडून समृध्दीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने सन २००७ पासून तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या गाव तंटामुक्त समित्या केवळ ग्रामपंचायतीच्या दप्तरापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. काही गावातील तंटामुक्त समित्या राजकीय वादावादीत गायब झाल्या आहेत. तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीला राजकीय स्वरूप येऊ लागली होती. तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावल्यामुळे पोलीस विभागावरील कामाचा व्याप वाढला आहे. या परिसरातील कोणत्याच गावातील तंटामुक्त समित्या सक्रिय दिसून येत नाहीत. त्यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला खिळ बसली की काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारीत आहे. गावागावात निर्माण होणारी वाद व तंटे गावातच सामोपचाराने गाव तंटामुक्त समितीच्या माध्यमातून संपुष्टात यावे आणि गावाला शांततेच्या मार्गाने समृध्दीकडे न्यावे असा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. या योजनेतून लाखो रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षिसे ग्रामपंचायतीने शासनाकडून प्राप्त करून घेतले. काही काळापर्यंत या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. काही गावातील तंटामुक्त समित्यांनी उत्कृष्ट कार्य करून शासनास मदत केली. परंतु अलीकडच्या काळात गाव तंटामुक्त समित्या पडद्याआड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.