पाणी पुरवठा योजना बंद : गावकऱ्यांची कसरत लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : मागील दोन दिवसांपासून पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने गावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला असून गंभीर समस्या निर्माण झाल्याचे चित्र गावात गेल्या दोन दिवसांपासून दिसत आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नळ योजना मागील काही वर्षापासून सूरु केली आहे. गावातील बहुतांश लोकांनी खाजगी नळ कनेक्शन घेऊन स्वत:च्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. गावामध्ये पाणी वितरण करण्यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्या गेली आहे. गावात ऐन पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना सुध्दा गेल्या दोन दिवसांपासून गावातील नळांना पाणी पुरवठा करणे बंद झाले आहे. नळयोजना बंद होण्यामागचे कारण मात्र कळू शकला नाही.यासंबंधात ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता गावात नळ सुरु नाहीत का? असा प्रतिप्रश्न करून माहिती घेतो असे त्यांनी सांगीतले. गावामध्ये सार्वजनिक हॅन्डपंप व विहीरी सुध्दा बऱ्या प्रमाणात आहेत. सध्या गावाशेजारील शेतामध्ये तसेच गावात काहींनी बोअरवेल मारून पाण्याची व्यवस्था केल्याने गावातील सार्वजनिक विहिरींमधील पाण्याची पातळी खोलवर गेल्याची भयावह स्थिती सध्या गावात पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये गावाची सार्वजनिक नळ योजना कुचकामी ठरत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून जनसामान्यांचे हालही होत आहे. पाण्यासाठी महिला वर्गाला जिवाचे हाल करावे लागत आहे. सध्या गावात रोहीणी नक्षत्रामध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊन पिण्याच्या पाण्याचा हाहाकार माजल्याचे चित्र सध्या गावात दिसत आहे. लाखो रुपयांची नळयोजना कुचकामी ठरत आहे. दोन ठिकाणच्या भल्या मोठ्या विहीरीमधून पाणी पुरवठा होत असतानी दोन-दोन दिवस ऐन टंचाईच्या दिवसात नळांना पाणी नाही हेच कळत नाही. ग्रामवासीयांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी गावात हाहाकार
By admin | Published: June 02, 2017 1:26 AM