गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही तालुक्यांतील २० गावे शुक्रवारपासून पाण्याखालीच आहे. रविवारी (दि.३०) सुद्धा ही गावे पाण्याखालीच होती. मध्य प्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी या गावांना पुराचा वेढा कायम आहे.गोंदिया तालुक्यातील डांर्गोली, काटी, कासा, पुजारीटोला, ब्राह्मणटोला, बिरसोला, जिरुटोला, कोरणी, भद्याटोला तर तिरोडा तालुक्यांतील रामाटोला, धापेवाडा, ढिवरटोला, चांदोरी खुर्द या गावांमध्ये तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला गावात पुराचे पाणी साचल्याने ही गावे पाण्याखाली आले आहे.चांदोरी खुर्द येथील मुलचंद भोयर, रवी भोयर, हरिश्चंद्र भोयर, बिसन सोनेवाने, किसन सोनेवाने, रुपलाल जमईवार, तिलकसाव जमईवार, दिलीप भगत, गिरधारी, जमईवार, डुलीचंद तुंबा, मुना तुंबा, भिवराम तुंबा, कालुतुंबा, भरत तुंबा यांच्या घरांमध्ये पाणी साचले होते. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या गावांमधील पूरपरिस्थिती कायम आहे. तर काही गावातील नागरिकांनी आपल्या घरांच्या छतावर आश्रय घेतला होता. गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चम्मूने पुराचा वेढा असलेल्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य रविवारी सकाळपासूनच सुरू केले.
वैनगंगा नदीच्या पुरामुळे 'ती' गावे अद्यापही पाण्याखालीच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 1:25 PM