अर्जुनी मोरगाव : थकीत वीजबिलाचा भरणा न झाल्याने वीज वितरण कंपनीने गावागावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गावे अंधारात सापडली आहेत. शासनाने पथदिव्यांचे वीजबिल भरून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सरपंच, उपसरपंच संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतीची आर्थिकस्थिती कोरोना महामारीने खालावली असून जिल्हा परिषदेने पथदिव्यांचे थकीत विद्युत बिल भरण्यासाठी हात वर केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत सापडले आहे. ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या रकमेतून पथदिव्यांच्या थकीत बिलांंचा भरणा करावा, अशा जिल्हा परिषदेने सूचना देऊन आपल्या हात झटकले आहे. तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेने पथदिव्यांचे थकीत वीज बिल आम्ही भरणार नाही, असा पवित्रा घेत शासनानेच पथदिव्यांचे थकीत वीजबिल भरावे व गाव खेड्यातील अंधार दूर करण्याची मागणी केली आहे. कोरोना महामारीमुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींची कर वसुली बंद आहे. ग्रामपंचायतीला इतर कोणताही उत्पन्नाचा स्त्रोत नसल्यामुळे पथदिव्यांचा थकीत विद्युत बिल भरणा कसा करावा, अशा बिकट स्थितीत ग्रामपंचायतनी सापडल्या आहेत. महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पथदिव्यांचा विद्युत बिलाचा भरणा करावा, असे वेळोवेळी आदेश काढून ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना देत आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीला फक्त गावातील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल या निधीतून भरावे लागते. त्याचबरोबर पथदिव्यांची केवळ दुरुस्ती व देखभाल या बाबीवर १५ व्या वित्त आयोगाची रक्कम खर्च करता येते.
.............
विद्युत पुरवठा सुरळीत करा
शासनाला व जिल्हा परिषदेला जाणीव असताना सुध्दा पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा भरणा करण्यासंदर्भात शासन व जिल्हा परिषद तगादा लावत असल्यामुळे ही व्यथा कुणाला सांगावी या संभ्रमात तालुक्यातील ग्रामपंचायती पडल्या आहेत. तथापी, महावितरणने पथदिव्यांच्या थकीत वीज बिलाचा रक्कम मागणीचा तगादा न लावता पथदिव्यांचा विद्युत पुरवठा नियमित ठेवावा, अशी मागणी तालुका सरपंच, उपसरपंच संघटनेचे अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे व सचिव अशोक कापगते यांनी केली आहे.
...................