गॅस वाटप : वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय व वन व्यवस्थापन समितीचा उपक्रम लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : जंगलव्याप्त परिसर असलेल्या इंझोरी ग्रामवासीयांना ग्राम संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या वतीने गावामध्ये रोजगार निर्मिती करुन गावाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. गावाच्या सभोवताल असलेला देखना रमनीय जंगल आपली संपत्ती समजून प्रत्येकाने झाडांच्या जोपासनेसाठी पुढे यावे. वनविभागाच्या सहकार्याने आज घराघरात गॅसच्या चुली पेटत आहेत. यामुळे महिलांना स्वयंपाक करताना होणारी आरोग्यविषयक गैरसोय दूर होत आहे. येत्या काही दिवसांमध्ये अख्खा गाव निश्चितपणे धूरमुक्त होणार, असा आशावाद बाजार समितीचे उपसभापती तथा इंझोरी वन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी व्यक्त केला. इंझोरी येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती व नवेगावबांध वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वतीने गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर होते. अतिथी म्हणून बाराभाटीचे क्षेत्र सहायक शेंडे, वनसमितीचे अध्यक्ष नामदेव मेंढे, बीट रक्षक मुनेश्वर, लालदा जांभूळकर, माजी सरपंच रविंद्र खोटेले, प्रल्हाद उके, पोलीस पाटील डाकराम मेंढे, दीपकर उके, उपसरपंच दीपिका रहिले, उदाराम शेंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी इंझोरी ग्राम वन समिती व वनविभागाच्या वतीने गावातील गरजू ४० लाभार्थ्यांना एच.पी. गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले. यापूर्वी ओबीसीच्या ३५, अनुसूचित जातीच्या ८ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले होते. उर्वरित ४२ लाभार्थ्यांना काही दिवसांमध्ये गॅस वितरित केले जाणार असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात भेंडारकर पुढे म्हणाले, चुलीवरील स्वयंपाकाने होणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. महिलांचे आरोग्य सृदृढ रहावे म्हणून प्रत्येकाच्या घरी गॅस चुली असाव्या. यासाठी प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरु केली आहे. गावकऱ्यांनी त्या योजनाचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. आपले गाव धुरमुक्त व्हावे यासाठी गावकऱ्यांनी गॅसचा नियमित वापर करुन होणारी जंगलतोड कमी करावी, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. संचालन बीट रक्षक मुनेश्वर यांनी केले.
गाव काही दिवसांत धूरमुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:18 AM