गोंदिया : तालुक्यातील डांगोर्ली येथील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावा. यासाठी मागील 17 वर्षापासून येथील गावकऱ्यांचा लढा सुरू आहे. मात्र आजवर लोकप्रतिनिधी आणि शासनाने केवळ येथील गावक-यांना पूल तयार करण्याचे पोकळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली. त्यामुळे अद्यापही पुलाचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने गावकऱ्यांची समस्या कायम असून 'ये पूल कब बनेगा असा सवाल करित आहे.
डांगोर्ली येथील वैनगंगा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आल्यास महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात ये-जा करण्याचा मार्ग सुकर होईल. डांगोर्ली हे गाव मध्यप्रदेशच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात आल्यास दोन्ही राज्यातील लोकांना व्यापार आणि इतर दृष्टीने सुध्दा ते सोयीचे होईल.
डांगोर्ली येथील अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पावसाळ्या सुध्दा धोका पत्थकारुन या नदीतून प्रवास करावा लागतो. त्यामुळे कधी धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाअभावी गावकऱ्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. याचीच दखल घेत गोंदिया जिल्हा दलित सेनेचे अध्यक्ष ओमकार बन्सोड यांनी याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रश्न केला. 10 डिसेंबर 2003 मध्ये नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान मोर्चा काढून व उपोषण केले होते. तेव्हा तत्कालीन सरकारने मध्यप्रदेश सरकारसोबत बोलून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
मात्र 17 वर्षांचा कालावधी लोटूनही हा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही. त्यामुळे गावकरी आणि संघटनेचा पुलासाठी संघर्ष कायम आहे. डांगोर्लीजवळ वैनगंगा नदीवर पूल तयार झाल्यास या दोन्ही राज्यांमध्ये उद्योग धंद्यात वाढ होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शिवाय विद्यार्थी आणि गावकऱ्यांना होत असलेला त्रास दूर होईल. त्यामुळे शासनाने याचा गांर्भियाने विचार करुन आतातरी पुलाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी वैनगंगा पूल निर्माण समितीचे अध्यक्ष ओमकार बन्सोड व गावकऱ्यांनी केली आहे.