अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बदली होऊनही नवीन तलाठ्याला पदभार दिलाच नाहीइंदोरा (बु.) : तिरोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या साजा-१ अर्जुनी येथील तलाठी भिवगडे यांच्या अरेरावी धोरणामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ त्रासले आहेत. सदर तलाठ्याची शेतकऱ्याप्रति वागणूक समाधानकारक नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष असून त्यांचे तात्काळ स्थानांतरण करून नवीन तलाठी देण्यात यावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी भिवगडे हे अर्जुनी गावात मागील एक वर्षापासून कार्यरत आहेत. ते जेव्हापासून या गावात आले तेव्हापासून त्यांची शेतकऱ्यांप्रति वागणूक चांगली नसून कुठल्याही कामाकरिता त्रास देणे सुरू आहे. शेतकऱ्यांचे सातबारा उतारे तसेच शेतीसंबंधी कुठल्याही दाखल्यासाठी पैसे मोजल्याशिवाय दाखले मिळत नाही. सदर तलाठी मुख्यालयात राहत नसून ८० किमी लांब असलेल्या स्वगावावरून ये-जा करतात. तलाठ्याबाबत १५ आॅगस्ट २०१५ च्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला व ग्रामपंचायतने या ठरावाच्या प्रति तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, आमदार यांना पाठवून स्थानांतर करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तलाठी भिवगडे यांचे स्थानांतर करण्यात आले, असे गावात सांगण्यात आले. फेब्रुवारी २०१६ मध्ये स्थानांतराचे आदेश आल्याचे अधिकारी सांगातात. मात्र दोन महिन्याचा कालावधी लोटून गेला, परंतु या तलाठ्याने आपला चार्ज दुसऱ्या तलाठ्यांना दिले नाही. याचे नेमके कारण काय? हेच जनतेला कळेनासे झाले. ेहे तलाठी जेव्हापासून अर्जुनी गावात आले तेव्हापासून शेतकऱ्यांना खूप त्रास आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ते वेळेवर कार्यालयात राहत नाही. शेतकऱ्यांशी अरेरावी करतात. कुठल्याही दाखल्यासाठी १०० रूपये घेतल्याशिवाय देत नाही. रेती व मुरूम तस्कराकडून अवैध वसुली करणे, हा त्यांचा नित्याचा काम आहे. या संदर्भात आमदार विजय रहांगडाले यांनासुद्धा येथील नागरिकांनी तक्रार दिली आहे. त्याचे स्थानांतरण करून देतो, असे आश्वासन आ. रहांगडाले यांनी ग्रामस्थांना दिले.आता स्थानांतरण झाले, पण हे तलाठी दोन महिन्यांपासून आपला चार्ज देत नाही. यामागील हेतू काय असावा, हे कळण्यास मार्ग नाही. करटी बु. येथील तलाठी गेडाम यांना येथील चार्ज देण्यात यावे, असे आदेश आल्याचे कळते. परंतु त्यांना चार्ज देण्यास तयार नाही. यामागे कोणत्या अधिकाऱ्याचे त्याच्या डोक्यावर हात आहे, हा संशोधनाचा विषय आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीवर लक्ष केंद्रीत करून या तलाठ्याचे स्थानांतर करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
तलाठ्यावर ग्रामस्थांचा रोष
By admin | Published: April 09, 2016 2:03 AM