गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि खासगी कोविड रुग्णालयात गुरुवारी (दि.१५) रात्री ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे जवळपास चारशे रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. याची माहिती विनोद अग्रवाल यांना हाेताच त्यांनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथून रात्रीच १३० ऑक्सिजन सिलिंडर मागविले. सिलिंडर वेळीच रुग्णालयात पोहोचल्याने चारशे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले. अन्यथा बिकट समस्या निर्माण झाली असती.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून, ऑक्सिजन व रेेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. येथील शासकीय महाविद्यालयातसुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल आहेत. गुरुवारी रात्री अचानक ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे चारशे रुग्णांचा जीव धोक्यात आला. ही बाब आ. विनोद अग्रवाल यांना कळताच त्यांनी रात्रीच सूत्रे हलविली. मध्यप्रदेशचे माजी मंत्री गौरीशंकर बिसेन आणि छत्तीसगडचे माजी मंत्री ब्रजमोहन अग्रवाल यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर मध्यप्रदेश येथून ४० आणि छत्तीसगड येथून ९०, असे एकूण १३० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाले. रात्री २.३० वाजेच्या सुमारास ऑक्सिजन सिलिंडर घेऊन वाहन मेडिकलमध्ये दाखल झाले. आ. विनोद अग्रवाल हे ऑक्सिजन सिलिंडर येईपर्यंत मेडिकलमध्ये ठाण मांडून होते. दरम्यान, त्यांनी वेळीच पावले उचलल्याने चारशे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले. गुरुवारी रात्रीच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आ. अग्रवाल यांनी माजी मंत्री गौरीशंकर बिसेन आणि बृजमोहन अग्रवाल व महेश ट्रेडिंग कंपनीचे आभार मानले.
...........
रात्री १ वाजता सुरू केली फॅक्ट्री
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून, बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याची बाब आ. अग्रवाल यांनी छत्तीसगडचे माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर त्यांनी राजनांदगाव येथील कंपनीशी संपर्क साधून रात्री १ वाजता फॅक्ट्री चालू करून दोन तासांत ९० ऑक्सिजन सिलिंडर भरून दिले. यासाठी राजनांदगावचे विक्की वोराह यांनीसुद्धा मदत केली. त्यामुळेच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होण्यास मदत झाली, तसेच ६० ऑक्सिजन सिलिंडर खासगी रुग्णालयांनासुद्धा देण्यात आले.
......
लिक्विड ऑक्सिजन येणार
गोंदिया येथील ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, तो दूर करण्यासाठी ७.५ मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन शुक्रवारी सायंकाळपर्यंत उपलब्ध होणार आहे. यामुळे दोन दिवस तरी जिल्ह्यात ऑक्सिजनची समस्या जाणवणार नाही. गुरुवारी रात्री ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाल्याने मोठा अनर्थ टळला. यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे, तहसीलदार खडतकर यांचेही सहकार्य मिळाले.
.....
जिल्ह्यात कोरोनामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच जण प्रयत्नरत आहेत. यासाठी जनतेनीही संयम बाळगून सहकार्य करण्याची गरज आहे.
- विनोद अग्रवाल, आमदार