लोकमत न्यूज नेटवर्क
बिरसी फाटा : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून, रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने व आस्थापने या काळात बंद राहणार आहेत.
परंतु, बिरसी फाटा परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाची भीती नसल्याचे दिसून येत आहे. नागरिक बिनधास्तपणे फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून, रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. अनेक रुग्णांचा मृत्यूदेखील झाला असून, ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४ एप्रिलच्या रात्रीपासून १ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असून, कलम १४४ लावले आहे. परंतु, नागरिक कोरोनाची भीती मनात न ठेवता विनामास्क अनावश्यक फिरत आहेत. अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायझरचा वापर करताना दिसून येत नाहीत. या विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांमुळेच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यापासून इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्याकरिता ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच असून, यात पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व गावातील काही लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. परंतु, या समितीचे पदाधिकारी या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेच आता काही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. संचारबंदी काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व अनावश्यक फिरणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासनाने कडक कारवाई करून दंड ठोठावावा, अशी मागणी केली जात आहे.