तलाठ्याला दोन हजारांचा दंड : मुदतीत माहिती अप्राप्तगोंदिया : तिरोड्याच्या संत सज्जन वार्डातील जागेश्वर जाऊळकर यांनी सावरीच्या (ता. गोंदिया) तलाठी साजा-२२ कार्यालयाच्या सन २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षांचे शासकीय येणे रक्कमांच्या प्रमाणित नोंदवहीच्या छायांकित प्रती माहिती अधिकारात मागितल्याय होत्या. मात्र सदर जनमाहिती अधिकाऱ्याने (तलाठी) विहीत मुदतीत माहिती न पुरवून माहिती अधिकाराचे उल्लंघन केल्यामुळे त्याला दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. प्राप्त माहितीनुसार, अपिलार्थी जाऊळकर यांनी मागितलेली माहिती १५ दिवसात उपलब्ध करून द्यावी व त्यावर माहिती अधिकाराचा शिक्का व स्वाक्षरी करून द्यावी, असे आदेश दिले होते. मात्र तलाठ्याने माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ७ (१) चा भंग केलेला असल्याने त्यांच्यावर कलम १९ (८) (ग) व २० (१) अन्वये शास्ती लादण्यात आली. तसेच अपिलार्थी जाऊळकर यांना झालेल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी माहितीचा अधिकार अधिनियमामधील कलम १९ (८) (ख) अन्वये दोन हजार रूपये नुकसान भरपाई धनादेशाद्वारे अपिलार्थी यांना ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश नागपूर खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त यांनी दिला. विशेष म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याने (तलाठी) विहीत मुदतीत माहिली न दिल्याने अपिलार्थी जाऊळकर यांनी प्रथम अपिलिय अधिकारी तथा तहसीलदार यांना प्रथम अपिल सादर केली. त्यातसुद्धा त्यांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी द्वितीय अपिल अधिकारी म्हणून राज्य माहिती आयोग, खंडपीठ नागपूर यांच्याकडे द्वितीय अपिल सादर केली. त्या द्वितीय अपिलाच्या सुनावनीत जनमाहिती अधिकारी तथा तलाठी सावरी यांनी कलम ७ (१) चा भंग केलेला असल्याने तलाठ्यावर शास्ती लादली व दोन हजार रूपयांचा दंड ठोठावला. सदर दोन हजार रूपये धनादेशाद्वारे अपिलार्थी जाऊळकर यांना ३० दिवसांच्या आत द्यावे, असे आदेश पारित केले. परंतु अपिलार्थी जाऊळकर यांना झालेल्या त्रासाची नुकसान भरपाई देणे बंधनकारक असतानाही जनमाहिती अधिकारी तथा तलाठी सावरी यांच्या स्तरावरून दिरंगाई केली जात आहे. तसेच त्यांनी कायदेशीर कार्यवाही अद्यापही पूर्ण केलेली नसल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन व राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाची अवहेलना झाली आहे. या प्रकारामुळे जनमाहिती अधिकारी तथा तलाठी सावरी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच आयोगाच्या आदेशानुसार आपल्याला हवी असलेल्या माहितीसह नुकसान भरपाई मिळावी, असा अर्ज अपिलार्थीने उपविभागीय अधिकारी (महसूल विभाग) व प्रथम अपिलिय अधिकारी तथा तहसीलदार गोंदिया यांना केले आहे. (प्रतिनिधी)
माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन
By admin | Published: February 07, 2017 12:57 AM