लाेकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या राजकुमार अभयकुमार धोती (३०, रा. कुंभारटोली) याचा पोलीस कोठडीतच शनिवारी (दि. २२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२, रा. कुंभारटोली) यांची रविवारी (दि. २३) जामिनावर सुटका झाली आहे.
आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून दोनवेळा संगणक संच व एलसीडीची चोरी करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि. २०) अटक केली होती. पथकाने त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर शुक्रवारी (दि. २१) पहाटे १ वाजता मृत राजकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना पथकाने आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते. शनिवारी (दि. २२) पहाटे ५.१५ वाजता राजकुमार धोती याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींना रविवार (दि. २३)पर्यंत पोलीस कोठडी असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांची जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान, पोलीस विभागात सध्या तणावाचे वातावरण आहे. पोलीस कोठडीत मृत्यू होणे ही बाब पोलिसांसाठी डोकेदुखीच आहे. या घटनेनंतर पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी आमगावचा दौरा करून या घटनेची माहिती घेतली आहे.
बॉक्स
सीआयडीच्या एसपी आमगावात
पोलीस कोठडीत राजकुमार धोती याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लक्ष्मी या रविवारी (दि. २३) आमगावात दाखल झाल्या असून, त्यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. संबंधित सर्वांकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे.