जेठभावडा ग्रामपंचायत : गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देवरी : तालुक्यातील आदिवासी, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आयएसओ मानांकीत ग्रामपंचायत जेठभावडाअंतर्गत येणाऱ्या सिंदीबिरी या गावाला देशातील तीन प्रमुख वैज्ञानिकांनी भेट दिली. गावात देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार यांनी दिलेल्या जागेवर सुरू करण्यात आलेल्या सातेरी मधमाश्याचे पालन केंद्र व शहद विक्री केंद्राची पाहणी त्यांनी केली. या रोजगारासोबत गट शेतीच्या माध्यमातून या ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या तिन्ही गावातील लोकांकरीता रोजगाराची संधी उपलब्ध करून सर्वांच्या हाताला काम देण्याकरीता सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. सिंदीबीरी गावाला भेट देणाऱ्या वैज्ञानिकामध्ये हरियाणा राज्यातील सेवानिवृत्त मुख्य वैज्ञानिक व हिसार अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीचे डॉ.आय.एस.हुड्डा, बुलडाणा येथील बी किपर्स राजूभाऊ बैरागी आणि पुलगावचे शंकर आत्राम यांचा समावेश होता. त्यांनी सिंदीबीरी येथील मधमाशी पालन व शहद विक्री केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि या गावची प्रगती पाहून जेठभावडा, सिंदीबीरी व मसूरभावडा या तिन्ही गावातील लोकांचे भविष्य आता बदलणार असल्याचे सांगितले. या शहद संकलन व विक्री केंद्रासह येथील लोकांनी जर गट शेतीच्या माध्यमातून व्यवसाय सुरू केला तर येथील लोकांंना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन यामुळे त्यांचे दिवस अवश्य पलटतील असे ते म्हणाले. सिंदीबीरी गावात महिला उत्पादक संघ कार्यरत असून यात १ हजार महिलांचा समावेश आहे. या ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या सर्व लोकांच्या हाताला काम व रोजगार मिळवून देण्यास येथील सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले व सचिव सुमेद बंसोड यांच्या सह संपूर्ण ग्रा.पं.चे सदस्य व गावकऱ्यांनी सुरू केलेल्या या कार्याला देशात वेगळे स्थान निर्माण करुन देण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही या तिन्ही वैज्ञानिकांनी दिली. याभेटीदरम्यान सरपंच डॉ.जे.टी.रहांगडाले, उपसरपंच भोजराज गावळकर, सचिव सुमेद बंसोड, तलाठी राजू उपरीकर, देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार, शेषराव किरसान, यादोराव कुंजाम, संजय साखरे आणि सर्व ग्रा.पं.सदस्यांसह गावातील बहुसंख्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार पोलीस पाटील राजू गावळकर यांनी मानले.(प्रतिनिधी)
सिंदीबिरी गावाला देशातील तीन वैज्ञानिकांची भेट
By admin | Published: February 12, 2017 12:33 AM