सडक-अर्जुनी : नगर पंचायत सडक - अर्जुनीच्या मतदार यादीचा घोळ, मतदारांमध्ये असंतोष, या मथळ्याखाली वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच नगर पंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विवेक मेश्राम यांनी याची दखल घेऊन नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मतदार यादी दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. कर्मचारी मतदार यादीच्या दुरुस्ती कामाला लागले असून, रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू आहे.
सडक - अर्जुनी नगर पंचायतीमध्ये एकूण १७ प्रभाग असून, मतदार संख्या ५ हजार ४२५ एवढी आहे. प्रत्येक प्रभागाची मतदार संख्या अंदाजे ३२० एवढी राहायला पाहिजे होती. परंतु प्रभाग क्रमांक १६ मध्ये एकूण मतदार ५२८ आहेत, तर प्रभाग क्र. ५ मध्ये ४४२ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये १६२, तर प्रभाग १२ मध्ये १७७ मतदार आहेत. अनेक मतदारांची नावे दोन प्रभागांमध्ये दिसून आली. तर काही मतदार अशा प्रकारचे आहेत, की नागरिक त्यांना ओळखतही नाहीत. प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास समान मतदार असावेत व बोगस मतदार कमी करावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
कोट
लोकमतमध्ये आलेल्या वृत्ताची दखल घेऊन नगर पंचायतीचे कर्मचारी आणि अधिकारी प्रत्येक प्रभागातील घरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. मतदार यादीतील चुकीची नावे त्वरित वगळण्यात येतील, तसेच नव्याने यादी तयार करण्यात येईल.
डॉ. विवेक मेश्राम, मुख्याधिकारी न. प. सडक-अर्जुनी