लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली, तेव्हा शहरी भागातील मतदान केंद्रावर गर्दी कमी दिसून आली. पण, ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मतदारसंघांत ६५.४५ टक्के मतदान झाले होते, तर मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी कायम होती. त्यामुळे ७० टक्क्यांवर मतदान होण्याचा अंदाज बांधला जात आहे. शहरीपेक्षा ग्रामीण भागात मतदानासाठी वाढलेला उत्साह आणि टक्का कुणाचे पारडे जड करणार, याचीच चर्चा आहे.
गोंदिया विधानसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात असले, तरी या मतदारसंघात थेट लढत ही महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यात होणार आहे. हे दोघेही सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत समोरासमोर आले आहेत.
या मतदारसंघात सकाळपासून मतदानाला संथ गतीने सुरुवात झाली होती. सकाळी ७ ते ९ या कालावधीत केवळ ५.५२ टक्के मतदान झाले होते, तर शहरी भागातील मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे कमी मतदान झाल्यास नेमके कुणाचे विजयाचे समीकरण बिघडणार याची चर्चा सुरू झाली होती. पण, शहरातील मतदान केंद्रांवर दुपारी १२ वाजेनंतर गर्दी वाढयला सुरुवात झाली. तर, या मतदारसंघातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. याही मतदारसंघात महिला मतदारांच्या रांगांनी लक्ष वेधून घेतले होते, तर पुरुष आणि युवा मतदारांमध्ये मतदाना प्रति उत्साह दिसून आला. त्यामुळेच ग्रामीण भागातील मतदारांचा मतदाना प्रति वाढलेला उत्साह नेमके कुणाचे पारडे जड करणार, याची मतदारसंघात चर्चा होती.
कुणी म्हणतो कांटे की टक्कर, तर कुणी म्हणतो एकतर्फी गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांमध्येही काट्याची टक्कर होईल, असा अंदाज सुरुवातीपासूनच बांधला जात होता. पण, बुधवारी मतदानानंतर हा सामना आता एकतर्फी असल्याची चर्चा मतदारसंघात होती. त्यामुळे नेमका कुणाचा अंदाज खरा ठरतो, हे पाहणे सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
वाढीव मतदान कुणाचा मार्ग मोकळा करणारगोदिया विधानसभा मतदारसंघात जेव्हा ६५ टक्क्यांवर मतदान होते, तेव्हा समीकरण बदलते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यात महिला मतदारांची भूमिका ही महत्त्वपूर्ण राहिली आहे. या मतदारसंघात सर्वाधिक ३६१ मतदान केंदे असून, ३ लाख २५ हजार ५५६ मतदार आहेत. यात महिला मतदारांची संख्या ही १ लाख ३५ हजार ७३१ आहे. त्यामुळे महिला मतदार नेमका कुणाचा विजयाचा मार्ग मोकळा करतात, है २३ तारखेला मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
मतदान प्रक्रिया सुरळीत गोंदिया विधानसभा मतदार संघात सर्व ३६१ मतदान केंद्रांवर सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया पार पडली, कुठल्याही मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद अथवा गोंधळाची तक्रार नव्हती. निवडणुकीदरम्यान चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
दुपारनंतर बदलला मतदारसंघाचा कलमतदान प्रक्रियेदरम्यान या मतदार संघात दुपारनंतरच कल बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर दुपारनंतर मतदारांची गर्दी वाढली. मतदारांची गर्दी वाढल्याने बऱ्याच मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजेनं- तरही मतदानाची प्रक्रिया सुरूच होती.