गोंदिया/भंडारा : विदर्भातील भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज, २१ डिसेंबरला सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली.
गेल्या तीन-चार दिवसापासून विदर्भात हुडहुडी वाढली आहे. कमाल तापमान हे ७.८ अंशावर आले आहे. नागपूरसह गाेंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, यवतमाळ, वर्धा, अमरावतीतील पारा उतरला आहे. परिणामी, सकाळच्या प्रहरी मतदार मतदानासाठी फारसे उत्सूक दिसले नाही. सकाळी ११ नंतर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडतील, असे चित्र आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या ५२ पैकी ३९ जागांसाठी ३४५ तर गाेंदियाच्या ५३ पैकी ४३ जागांसाठी २४३ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. त्यासाेबतच ३८ नगर पंचायतीच्या ५४१ जागांसाठी २३३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गडचिराेलीत सर्वाधिक नऊ नगर पंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक हाेत असून, तेथे ५५४ उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी जागा वगळता ही सार्वत्रिक निवडणूक हाेत आहे. ओबीसी जागांवरील आरक्षण संपुष्टात आले असून, आता १८ जानेवारी २०२२ राेजी तेथे खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक हाेणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबर हा निवडणुकीचा पहिला टप्पा आणि १८ जानेवारी हा दुसरा टप्पा ठरणार आहे. दाेन्ही टप्प्यातील निवडणुकीचा निकाल एकत्रितरीत्या १९ जानेवारी राेजी लागणार आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहणार आहे. नक्षलप्रभावित गडचिराेलीसह गाेंदियातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी तालुक्यात सकाळी ७.३० ते दुपारी ३ या वेळेत मतदान होणार आहे.
जिल्हा परिषद - जागा - उमेदवार
भंडारा - ३९ - ४१७
गाेंदिया - ४३ - २४३
जिल्हा - न.पं. - जागा - उमेदवार
अमरावती - २ ३० १२२
भंडारा - ३ ३९ १६७
चंद्रपूर - ६ ८२ ३३०
गडचिराेली - ९ १४२ ५५५
गाेंदिया - ३ ४५ १९७
नागपूर - २ २६ ९९
वर्धा - ४ ५४ २३३
यवतमाळ - ६ ८४ ४७५
बुलडाणा - २ २६ ९५
वाशीम - १ १३ ५९
एकूण ३८ ५४१ २३३२