गोंदिया : मागील तीन महिन्यांचे मानधन न मिळाल्यामुळे मनरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कालावधीही संपलेला आहे. त्यांना वाढीव मुदतीचे कंत्राटही देण्यात आले नाही. त्यामुळे मंगळवारपासून (दि. २३) ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या १३८ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे मनरेगाच्या कामावर असलेल्या ४० हजार मजुरांची मजुरी बुडण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्ह्यातील ४३७ ग्रामपंचायतींतर्गत आजघडीला ६ हजार ६२ कामे सुरू असून या कामांवर ४० हजार ३९२ मजूर कार्यरत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर, डिसेंबर २०२० व जानेवारी २०२१ या तीन महिन्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन देण्याची गरज असताना शासनाने त्यांना वाढीव मानधन दिले नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुदत संपली असून त्यांना मुदतवाढही देण्यात आली नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील १३८ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. परिणामी, जिल्ह्यातील मनरेगाच्या कामावरील मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. या कामबंद आंदोलनामुळे मजुरांची मजुरी बुडेल, त्यांना नवीन काम मिळणार नाही, मजुरांच्या कामाचे मूल्यांकन होणार नाही, नवीन कामाची मागणी उपलब्ध होणार नाही, केलेल्या कामाची मजुरी मिळणार नाही. ही सर्व कामे ऑनलाइन करावी लागत असल्यामुळे या १३८ कर्मचाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. जीव तोडून काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांना तीन महिन्यांचे मानधन न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनात आर. के. धुळे, आर. एल. मेश्राम, एस. पी. कस्पटे, पी. के. कापगते, एम. एस. मेश्राम, साखरे, एस. टी. चौधरी, आर. एस. भवर, जी. बी. साखरे, एम. एस. बिसेन, एम. एस. भगत, एच. डी. बघेले, रहांगडाले, के. एम. हरिणखेडे, पी. सी. बोरीकर, आशिष घाटे यांचा समावेश आहे.