गोंदिया - जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. तर नदी काठालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तिरोडा व गोदिंया तालुक्यातील काही भागांतून ही नदी वाहत असल्याने काटी, बिरसोला येथे वैनगंगा व बाघनदीचा संगम, तसेच महालगाव धापेवाडा येथे चनई नदी आणि चांदोरी खु. येथे बावनथळी नदीचा संगम असून या सर्व नद्यांवर शिरपुरबांध, कालीसराड, पुजारीटोला, संजय सरोवर, इंदिरा सागर बावनथळी प्रकल्प मोठे असून सर्व बांध तुडुंब भरले आहेत. यातील पाणीही मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आले आहे. यामुळे सर्व धरणाचे पाणी वैनगंगा नदीत येत असल्याने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणावर घरांची पडझडही झाली आहे. मात्र प्रशासन सुस्त आहे.