गोंदिया : डोक्यावर असलेल्या ११ कोटींच्या करवसुलीचा डोंगर सर करण्यासाठी गोंदिया नगर पालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी सात जणांचे करवसुली पथक तयार करण्यात आले आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे पथक १७ जानेवारीपासून करवसुली मोहीम राबविणार आहे. सुमारे सात कोटींची जुनी थकबाकी व चालू वर्षातील सुमारे पावणेचार कोटींचा कर अशाप्रकारे एकूण ११ कोटींची करवसुली नगर परिषदेला करायची आहे. यामध्ये सामान्य नागरिकांकडे कमी, मात्र धनाढ्यांसह शासकीय मालमत्ता, शाळा-महाविद्यालय व काही मोठ्या खासगी मालमत्ताधारकांकडे मोठी रक्कम थकबाकी आहे. कर वसुलीदरम्यान राजकीय अडसर येत असल्याने वसुलीचा हा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे. हे जरी उघड सत्य असले तरी पालिकेचे कर्मचारी मात्र काही बोलण्यास तयार नाही. याचाच परिणाम म्हणून करवसुलीचा आकडा ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे कर वसुलीचा हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘लोकमत’ने त्याबाबत सतत पाठपुरावा करीत पालिकेला करवसुलीसाठी आणि नागरिकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे कर वसुली अधिकाऱ्यांची मागणी करण्याचे ठरवले. लोकमतने शहरातील काही मोठ्या थकबाकीदारांसह शासकीय मालमत्ताधारक मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रकाशित केली. नेमकी याचीच दखल घेत पालिकेच्या कर वसुली विभागाने वसुली पथक तयार करून कर वसुली मोहीम सुरू करण्याचे ठरविले आहे. (शहर प्रतिनिधी)
कर वसुलीसाठी कसली कंबर
By admin | Published: January 17, 2015 1:48 AM