लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि ६४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी बुधवारपासून (दि. १) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पण, पहिल्याच दिवशी या निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे पहिला दिवस निरंक गेला असून, उमेदवारांनीसुध्दा घाई न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेट ॲन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ६ डिसेंबर, तर नगरपंचायतीसाठी ७ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. त्यातच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. सध्या मुलाखतींचे सत्र सुरु आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उर्वरित पाच दिवसात वाढणार गर्दी
- ग्रामीण राजकारणाची दिशा ठरविण्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींची भूमिका महत्वपूर्ण असते. त्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्यादेखील अधिक असते. पक्षाकडून तिकीट मिळाले तर ठीक नाही तर अपक्ष लढू, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे, तर राजकीय पक्षांनी अद्याप उमेदवार फायनल केले नाहीत. त्यामुळे ही यादी दोन दिवसात फायनल होताच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. बंडखाेरी टाळण्यासाठी शेवटच्या टप्प्यात यादी n जागा एक अन दावेदार अनेक अशी स्थिती या निवडणुकीत आहे. त्यातच सर्वच राजकीय पक्षात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. ज्येष्ठाला डावलून कनिष्ठाला उमेदवारी दिली तर निवडणुकीत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पक्षाचे उमेदवार आधीच जाहीर न करता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करुन बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून झालेला दिसतो आहे.
गुलाबी थंडी अन बैठकांचे सत्र - जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. रात्री दोन वाजेपर्यंत या बैठका चालत आहेत. त्यामुळे गुलाबी थंडीत निवडणुकीने ऊब निर्माण केल्याचे चित्र आहे.
भाऊ, आपला उमेदवार कोण रे !- जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला निवडणूक हाेऊ घातली आहे. मात्र, यासाठी अद्याप उमेदवार घोषित झालेले नाहीत. त्यामुळे आपल्या क्षेत्राचा उमेदवार कोण, कुणात मुख्य लढत होणार यावरुन चावडी आणि शेकोट्यांवर गप्पा रंगल्याचे चित्र आहे. या चर्चांमध्ये भाऊ, आपला उमेदवार कोण रे, याचीच चर्चा आहे.