आॅनलाईन लोकमतगोंदिया : नोव्हेंबर महिना अर्धा संपल्यानंतरही जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीच्या आॅनलाईन प्रक्रियेमुळे पुन्हा रक्कम जमा होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ‘वेट अॅन्ड वॉच’ करावे लागणार आहे.राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र दिवाळी संपून महिनाभराचा कालावधी लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७३ हजार ५०७ शेतकरी प्राथमिक यादीत पात्र ठरले होते. यानंतर चावडी वाचन करून अर्जांची ग्रीन, येलो व रेड यादीत विभागणी करण्यात आली. त्यानंतर या यादीची अंतिम चाचपणी करण्यासाठी मुंबई येथील आयटी विभागाकडे पाठविण्यात आली आहे. यापैकी आयटी विभागाने १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रीन यादीतील २८४८ शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकाना पाठविली. यात जिल्हा बँकेचे २६२० व राष्ट्रीयीकृत बँकेच्या २८ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शासनाकडून जिल्हा बँकेला १० कोटी ४२ लाख २९ हजार ३५७ रुपये व राष्ट्रीयीकृत बँकाना १० लाख ३३ हजार २९९ रुपयांचा निधीदेखील प्राप्त झाला आहे.मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ही रक्कम ग्रीन यादीतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास पुन्हा पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कर्जमाफीची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दोन महिने चालणार प्रक्रियाकर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यापैकी बऱ्याच अर्जांमध्ये त्रृट्या आढळल्या. तर एकाच कुटुंबातील चार ते पाच सदस्यांनी अर्ज भरले. तर काहींनी एकच आधार क्रमांक जोडला त्यामुळे घोळ निर्माण झाला आहे. या अर्जांची पडताळणी करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्यास पुन्हा दोन महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता या विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कर्जदार शेतकऱ्यांची यादी पाठविली होती. त्यात जिल्ह्यातील ७३ हजार ५०७ शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र चावडी वाचनानंतर यातील बऱ्याच शेतकऱ्यांची नावे कमी झाली. त्यानंतर पुन्हा अर्जांची चाचपणी करण्यासाठी हे सर्व अर्ज मुंबई आयटी विभागाकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे अंतिमत: जिल्ह्यातील किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, याची आकडेवारी बँका आणि निबंधक कार्यालयाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नाही.
पीक कर्जापासून वंचितकर्जमाफीच्या घोषणेमुळे जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा पीक कर्जाची उचल केली नाही. त्यातच यंदा जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचा विमा न उतरविल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.