शिक्षकांच्या आशा पल्लवित : संवर्गनिहाय रिक्त होणारी पदे भरणारगोंदिया : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदल्यांचे प्रकरण ‘लोकमत’ने लावून धरल्यानंतर यातील गांभिर्य सर्वांच्या लक्षात येत आहे. खुद्द शिक्षणाधिकारी यु.आर. नरड यांनी यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्यांना आता प्रथम प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेला यावर्षी संच मान्यता अजून आलेली नाही. ती येताच हा प्रश्न शक्य होईल तेवढा निकाली काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षणाधिकारी नरड यांनी जाहीर केलेली ही भूमिका तमाम बदलीग्रस्त शिक्षकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. आपल्या विविध समस्यांमुळे ग्रस्त असलेले हे शिक्षक गृहजिल्ह्यात बदली होण्याच्या आशेने कित्येक दिवसांपासून प्रयत्नशिल असताना आतापर्यंत त्यांच्या वाटेला केवळ उपेक्षाच आली. पण आता त्यांच्या समस्यांना वाचा फुटल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेसोबत पदाधिकाऱ्यांच्याही हृदयाला पाझर फुटत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी नरड यांनी सांगितले की, सध्या गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांवर प्राथमिक (डी.एड्.) शिक्षक अतिरिक्त आहेत. मात्र पदवीधर शिक्षकांची कमतरता आहे. प्राथमिकच्या शिक्षकांमधून पदवीधर शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा आधी समायोजित केल्या जातील. त्यामुळे अतिरिक्त ठरणारे शिक्षक कमी होऊन जवळपास ३५ जागा रिक्त होतील. त्यामुळे तेवढ्या जागा आंतरजिल्हा बदलीतून भरणे शक्य होईल. पण त्यापूर्वी संच मान्यता एकदा मिळाली म्हणजे ही प्रक्रिया करण्यास वेग येईल, असे त्यांनी सांगितले.शिक्षकांच्या व्यथांना अंतच नाही...गृहजिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावर नोकरी करणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांना स्वत:च्या कुटुंबियांपासून, नातेवाईकांपासून, मित्र-मैत्रिणींपासून दूर राहताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातूनच अनेकांमध्ये नैराश्य येऊन त्यांची प्रकृती खालावली. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘लोकमत’ने ही समस्या उचलून धरल्यानंतर आपल्या समस्या सांगणाऱ्या शिक्षकांचे अनेक फोन लोकमतकडे आले. काहींनी प्रत्यक्ष भेटून लोकमतचे आभार व्यक्त केले.पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावाशिक्षकांच्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समिती गोंदियाने पुढाकार घेतला. आपल्या समस्या, व्यथा प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि वैफल्यग्रस्त झालेल्या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी या कृती समितीचे अध्यक्ष रविंद्रकुमार अंबुले व इतर पदाधिकारी सतत प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीही हा विषय मनावर घ्यावा आणि शिक्षकांना त्यांच्या कुटुंबियात राहण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा कृती समितीने व्यक्त केली आहे.बदल्यांवरील निर्बंध उठविलेआंतरजिल्हा बदल्यांवर काही वर्षापूर्वी असलेले निर्बंध नुकतेच हटविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी नरड यांनी सांगितले. सध्या एकाच प्रवर्गात मोडणाऱ्या दोन शिक्षकांच्या आपसी आंतजिल्हा बदल्या सुरूच आहेत. पण संच मान्यता आल्यानंतर ज्या प्रवर्गाच्या जागा रिक्त होतील त्या प्रवर्गातील शिक्षकाला गृहजिल्ह्यात येण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेला संच मान्यतेची प्रतीक्षा
By admin | Published: November 22, 2015 2:03 AM