लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : खरीप हंगामात आधारभूत किंमतीत विकलेल्या धानावर शासनाने बोनस जाहीर केला होता. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ महिने लोटूनही बोनस मिळालेला नाही. त्यात आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांची हाती पैसा नसल्याने त्यांची चिंता वाढली असून बोनस खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्था, सेवा सहकारी संस्था व तालुका भात खरेदी विक्री संस्थांमार्फत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरून खरीप हंगामातील धान खरेदी केली जाते. ५० क्विंटल पर्यंत धानाला ५०० रुपये बोनस व वाढीव २०० रु पये ७०० रु पये प्रतिक्विंटल मागे देण्यात येणार होते. ऑक्टोंबर महिन्यापासून आता ५ महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्यापही धानाच्या विक्रीवरील बोनस शेतकºयांच्या खात्यात आला नाही. विशेष म्हणजे, आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकऱ्यांना पुन्हा खरीपाची तयारी करावयाची आहे. हाती पैसा नसल्याने शेतकऱ्या बोनसचा आधार होता. मात्र हंगाम तोंडावर असूनही खरीप हंगाम २०१९-२० मध्ये विकलेल्या धानाचा बोनस मिळाला नसल्याने शेतकऱ्यांसमोर सन २०२०-२१ मधील खरीप हंगामाचे आव्हान उभे आहे.या हंगामासाठी पैसे आणायचे कोठून? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून शेतीपूरक किंवा पर्यायी कुठलेही कामधंदे शेतकऱ्यांना नाही. त्यात रोजगार हमीची कामे नाही. अशा रोजगारांतून मिळणाऱ्या पैशांच्या भरवशावर खरीप हंगामाची तयारी शेतकरी करीत होते. साधारणत: शेतकरी १५ मे पासून खरीपाच्या तयारीला लागतो. परंतु ‘लॉकडाऊन’च्या काळात बी-बियाणे खरेदीचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. बियाणे महामंडळाचे धानाचे बियाणे पंचायत समिती मार्फत अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जाते. मागील वर्षी हे बियाणे बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळालेच नाही. अर्जुनी-मोरगाव येथील कृषी केंद्रात सातबारा गोळा करून पंचायत समितीतून अनुदानावर मिळणारे बियाणे मोजक्या कृषी केंद्रात उपलब्ध होतात कसे? मग ही बियाणे शेतकºयांना जादा भावाने विकली जातात. अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी मागील वर्षी होत्या.तर काही कृषी केंद्रातून विकले जाणारे बियाणे खरीप व आता रब्बी हंगामात निकृष्ट दर्जाचे निघाल्याचे निदर्शनास आले आहे. कधी अवकाळी पावसाचा फटका तर कधी निकृष्ट बियाणे यामुळे शेतकरी धान पिकाच्या भरघोस उत्पन्नापासून वंचित राहतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला शेतकरी बळी पडतो. यंदा अनुदानावर पंचायत समितीतून मिळणारी बियाणे तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कृषी सहायक व पर्यवेक्षक यांच्यामार्फत दिले जावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
पाच महिने लोटूनही बोनससाठी प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 5:00 AM
तालुक्यातील शेतकऱ्यांना ५ महिने लोटूनही बोनस मिळालेला नाही. त्यात आता खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांची हाती पैसा नसल्याने त्यांची चिंता वाढली असून बोनस खात्यात जमा करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
ठळक मुद्देशेतकरी सापडला अडचणीत : शेतकऱ्यांची खरीप हंगामात अडचण