गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या चुरडी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास करण्यासाठी पोलिसांना उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. डॉ. कांचन रहांगडाले यांनी केलेल्या उत्तरीय तपासणीत मालता रेवचंद बिसेन, मुलगा व मुलगी यांचा मृत्यू त्यांच्या डोक्यावर लागलेल्या मारामुळे होऊ शकतो, तर रेवचंद बिसेन यांचा मृत्यू गळफासामुळे होऊ शकतो असा अभिप्राय दिला आहे. परंतु, त्या मृतदेहांचे चौघांचे व्हिसेरा प्रिझर्व करून नागपूरच्या रासायनिक प्रयोगशाळेत पाठविले आहे. या प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यंत पोलिसांना तपास कोणत्या दिशेने करावा हा प्रश्न आहे.
चुरडी येथील घटना घडल्यावर ठाणेदारांपासून, तर जिल्ह्याचे सर्वच बडे अधिकारी येथे ठाण मांडून आहेत. घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. या घटनेसंदर्भात तिरोडा ठाणेदाराला सूचना दिल्यात. खैरबोडी येथील अकुंश चामलाटे यांच्या तक्रारीवरून या घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. घटनेचा तपास ठाणेदार योगेश पारधी करीत आहेत. या प्रकरणाची गुंतागुंत सोडविण्यासाठी आता सायबर सेलही कामाला लागले आहे. सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांचेही पथक या खुनाच्या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या चौघांच्या हत्येपूर्वी त्यांचा मोबाईल कॉल कनेक्शन या घटनेतील आरोपींपर्यंत पोहोचवतील असा विश्वास आहे. मागील महिनाभरात या चारजणांनी कुणाकुणाशी संपर्क केला, त्यांचे झालेले संभाषण, चॅटिंग ही या घटनेचा उलगडा करण्याची शक्यता आहे.
............
तिसऱ्या दिवशी गूढ कायमच
तालुक्यातील ग्राम चुरडी येथे एकाच घरी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले. ही धक्कादायक घटना मंगळवारी, २१ सप्टेंबरला उघडकीस आली. यात तिघांच्या डोक्यावर लोखंडी अवजड वस्तूने प्रहार करून खून करण्यात आल्याचे उघड झाले. मात्र, चौथा मृतदेह गळफास लागलेल्या स्थितीत आढळल्याने प्रकरणातील गूढ वाढले. यात त्या कुटुंबप्रमुखाची हत्या की आत्महत्या, हे गूढ उकल झाल्यावरच मारेकरी होणार उघड. मारेकरी घरचा की बाहेरचा, हेही ठरणार; पण हत्या की आत्महत्या हा गुंता वाढल्याने प्रकरणातील गूढ कायम आहे.
..........
चुरडीला आले पोलीस छावणीचे स्वरूप
चुरडी येथील घटनेतील गूढ वाढत आहे, तर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तिरोडा पोलीस, गंगाझरी पोलीस, सीआरपीएफ, पॅरा मिलिटरी फोर्स व गोंदिया येथील राखीव पोलिसांच्या तुकड्या तिरोडा शहर व चुरडी येथे तैनात करण्यात आल्या आहेत.
......
तपासाची दिशा आणि मारेकरी होणार उघड
हत्याकांड झालेल्या घरातून पोलिसांनी तीन मोबाईल जप्त करून परीक्षणासाठी पाठविले. त्यांच्या परीक्षणात काय आढळले. भोजनाची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा काय निष्कर्ष आला. शिवाय फिंगर प्रिंटचा अहवाल काय सांगतो. त्यातून काय निष्पन्न होत आहे.
.......
पाचही टीमच्या तपासात काय आढळले?
चुरडी हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पोलीस विभागाने पाच टीम स्थापित केल्या. या पाचही टीमच्या तपास आणि चौकशीत आतापर्यंत काय मिळाले याकडे लक्ष लागले आहे.