बनगाव येथे घाणीचे साम्राज्य
आमगाव : बनगाव येथील वाॅर्ड क्रमांक- ६ मधील नहर रोड , अनिहानगर व कामठा रोड परिसरात कचरापेटी नसल्याने घाण पसरली आहे. परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले असून, कचरापेटी लावण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र घाण पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याकरिता नगर प्रशासनाने प्रभागात लक्ष केंद्रित करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
कचरापेट्यांकडे दुर्लक्ष
बाम्हणी खडकी : येथे ग्रामपंचायतस्तरावर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकांत कचरापेट्या बसविण्यात आल्या आहेत, मात्र या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यावरून ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष आहे हे दिसून येते.
विषाणूजन्य आजाराची साथ
गोंदिया : हवामानातील बदलाने परिसरात विषाणूजन्य आजाराची साथ पसरत आहे. यात लहान बालके व म्हाताऱ्यांना जास्तच त्रास होत आहे. रुग्णालयात गर्दी वाढत असून, खासगी डॉक्टर व मेडिकल मालकांची चांदी होत आहे. गरिबांना मात्र महागाईचा सामना करता करता नाकीनव आले आहेत.
मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत
गोंदिया : मागील काही दिवसांपासून धान कापणी व मळणीच्या कामांना वेग आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. त्यातच काही भागात मजुरी वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे.
बेरोजगारांच्या हातांना काम द्या
अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र धानावर आधारित उद्योग नसल्याने युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारांनी काम मिळवून देण्याची मागणी केली जात आहे