४.४७ कोटींचा निधी मंजूर : अद्ययावत कार्यालय हलविण्यास अडचणयशवंत मानकर - आमगावतालुक्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जात असलेल्या महसूल विभागाचे तहसील कार्यालय जर्जर अवस्थेत आहे. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर होऊन सुद्धा बांधकामाच्या शुभारंभासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचारी जुन्या इमारतीत जीव मुठीत घेऊन काम करित आहेत.येथील तहसील कार्यालयात शासनाच्या विविध योजनांचे कार्यान्वयन करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु असते. नागरिकांच्या दैनंदिन कामासाठी या कार्यालयात एकच गर्दी दिसून येते. कार्यालयाला अद्ययावत करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु वाढत्या कार्यालयीन कामात अधिक वाढ होत असल्याने जागेअभावी कार्यालयात बंद फाईलींना गोदामाचे स्वरुप येत आहे.गोंदिया तालुक्यात समाविष्ट आमगावला १९८० मध्ये स्वतंत्र्य तालुक्याची स्थापना करून आमगाव तालुका निर्माण करण्यात आला. आमगावला कार्यालयीन कामांसाठी पुर्वी भाड्याने व नंतर नवीन इमारत बांधकाम करुन कार्यालयीन कामांना गती देण्यात आली. आजघडीला तालुक्यातील ८३ महसुली गावांचा कारभार तहसील कार्यालयातून करण्यात येत आहे. कार्यालयात महसुलअंतर्गत विविध विभाग तयार करण्यात आले. परंतु जागेअभावी कार्यालयात अडचण आहे. अधिकाऱ्यांचे निवासस्थान जीर्ण झाले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी वसाहत नसल्याने कर्मचारी अपडाउनवर आहेत. तर ३० वर्षापुर्वी बांधकाम करण्यात आलेली कार्यालयीन इमारत जीर्ण झाली आहे. कार्यालयाच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. इमारतीचे छत पावसाळ्यात झिरपत असल्याने कार्यालतील महत्वपूर्ण दस्तावेज पाण्याखाली येत आहे. अशा जर्जर इमारतीत अधिकारी व कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन दैनंदिन कार्य करीत आहेत.तालुका महसूल विभागाची इमारत कार्यालयीन कामासाठी अपूर्ण असल्याने व जीर्ण झालेल्या इमारतीला जमीदोस्त करुन नवीन सोईस्कर इमारतीचे बांधकाम करावे यासाठी शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये चार कोटी ४६ लाख ८७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. शासनाकडून मिळालेल्या निधीच्या सहायाने इमारत बांधकाम व्हावे यासाठी बांधकाम विभागाने निविदा काढल्या. परंतु आवंटन झालेल्या निविदेला सार्थक रुप मिळेनासे झाले. तहसील कार्यालय हे इमारत बांधकामापुर्वी हलविण्यासाठी जागेचा शोध लागत नसल्याने नवीन इमारत बांधकामाला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. तहसीलदार राजीव शक्करवार यांनी इमारत बांधकाम होईपर्यंत कार्यालयासाठी नव्या जागेचा शोध घेतला. परंतु अपुर्ण व्यवस्थेमुळे कार्यालय हलविण्यात उशीर होत आहे असे कार्यालयातून सांगीतले जात आहे. त्यामुळे जीर्ण व पावसाने पाझर फुटलेल्या इमारतीत कार्यालयीन कामे करण्यात कर्मचारी हतबल झाले आहेत.
तहसील कार्यालयासाठी नवीन इमारतीची प्रतीक्षा
By admin | Published: August 24, 2014 12:04 AM