अर्जुनी माेरगाव : राज्य शासनाने मोहफुुलावरील उत्पादन शुल्क विभागाचे निर्बंध उठविले. त्यामुळे मोहफूल संकलन करून विक्री करणे सोयीचे झाले आहे. यामुळे बाजारपेठ खुली झाली. मोहफुलाला अपेक्षित दर मिळेल व परप्रांतातून चोरीने मोहफूल येणार नाही. यामुळे स्थानिक मोहफूल संकलित करणाऱ्यांना बाजारपेठेत चांगला भाव मिळेल. त्यामुळे मोहफूल उपलब्ध असणाऱ्या परिसरात मोहफूल प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील जंगलात व शेताच्या बांधावर अनेक मोहफुलांची झाडे दिसतात. जिल्ह्यातील सालेकसा, तिरोडा, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, देवरी या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची झाडे आहेत. यापूर्वी बंदी असल्यामुळे या फुलांची कमी किमतीत विक्री करावी लागत होती. जंगलव्याप्त परिसरात फुलांची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. आदिवासीबांधव फुले जमा करण्याचे काम करतात. त्यांच्याकडून अत्यल्प दरात खरेदी केली जात होती. नाईलाजाने त्यांना कमी किमतीत विक्री करावी लागत होती. दरवर्षी मार्च ते मे दरम्यान वृक्ष बहरतो. एका मोहवृक्षापासून सुमारे ४० ते ५० किलोग्रॅम व मोहफुले प्राप्त होतात. आतापर्यंत दारू गाळप करण्याकरिता मोह फुलांचा उपयोग केला जात होता. परप्रांतातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात आयात केली जात होती. बाजारपेठ बंद असल्यामुळे काही व्यावसायिकांचे चांगलेच फावत होते. आता बाजारपेठ खुली झाल्याने व मोहफुलांनासुद्धा चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शासनाने या दिशेने पाऊल टाकून मोहफुलावर आधारित उद्योग स्थापन करण्याची गरज आहे.
बॉक्स
मोहफुलाला सुगीचे दिवस
मोहफुलापासून दारू तयार करण्यात येत होती. परंतु मोहफुलाच्या औषधीकरिता पशुखाद्य, शीतपेय, इंधनासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात मोहफुलाची मागणी व त्याचा भाव येथे अधिक येणार आहे.
प्रक्रिया उद्योग व संशोधनाची गरज
ऊस, संत्रा, धान्य, द्राक्षे, काजू यापासून दारू तयार केली जाते. त्यांच्या कारखान्यांना शासनाची मान्यता आहे. त्याचप्रमाणे मोहफुलापासून दारू तयार करणे व औषधात वापर होण्याकरिता प्रक्रिया उद्योगाची व त्यावर संशोधन करण्याची गरज आहे. मोहफूल हे औषधीयुक्त असल्यामुळे मोहफूल वृक्ष लागवड चळवळ राबविण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत मिळणार आहे. आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रक्रिया उद्योग लवकर सुरू होण्याची गरज आहे. आर्थिक विकासाला अधिक चालना मिळेल.