लोकमत न्यूज नेटवर्कखातीया : बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे.गेल्या आठ वर्षापासून बिरसी विमानतळामध्ये गावातील काही लोकांचे घर अधिग्रहीत झाले असता त्यांना शासनाच्यावतीने पुर्नवसन पॅकेज जाहीर करून याची यादी गेल्या सहा महिन्यांपुर्वीच बिरसी येथील ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आली होती. पण अद्याप जागा व रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये जमा झाली नाही. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. बिरसी विमानतळाने नवीन बांधकामावर बंदी लावल्याने येथील नागरिक गेल्या आठ वर्षापासून जीर्ण झालेल्या घरांतच दिवस काढत आहेत.जुने घर पाडू शकत नाही व नवे घर बांधू शकत नाही अशी त्यांची फसगत झाली आहे. त्यामुळे त्यांना जीर्ण झालेल्या घरांमध्येच राहावे लागत आहेत. गावकऱ्याच्यांवतीने वेळोवेळी प्रशासनाला या संदर्भात कळविले असता शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे आम्ही मृत्यूशय्येवर पडणार तेव्हा प्रशासन जागे होणार काय? अशी ओरड आहे.सन २०१६ मध्ये मे महिन्यात आलेल्या चक्रीवादळात अनेक लोकांच्या घरावरील कवेलू व टिनाचे छत उडून गेले. एवढेच नव्हे तर गेल्या ४ जून रोजी आलेल्या वादळीवारा व पावसामुळे बिरसी येथील १० ते १५ घरांचे पुन्हा छत उडून गेले. अशा परिस्थितीत त्यांना पक्क्या घरांची आवश्यकता असूनही गेल्या आठ वर्षांपासून जीर्ण घरांमध्येच रहावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असून त्वरित जागा देऊन पुनर्वसनाची मागणी केली आहे. यादरम्यान जिवीत हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवालही येथील नागरिक करीत आहेत.
आठ वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:22 PM
बिरसी विमानतळामुळे विस्थापीत झालेल्या नागरिकांचे अद्याप पुनर्वसन झाले नाही. त्यामुळे त्यांना आजही जीर्ण घरांमध्ये दिवस काढावे लागत असून यापासून कधीही धोका होण्याची शक्यता आहे. शासनाचे याकडे दुलक्ष असल्याने येथील नागरिकांत भीती शिवाय रोषही व्याप्त आहे.
ठळक मुद्देबिरसी विमानतळ : नागरिकात भीती व रोष