जमिनीचा अभाव : सालेकसा व सडक-अर्जुनीवासीयांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील सालेकसा व सडक-अर्जुनी ही दोन्ही तालुके बस स्थानकापासून वंचित आहेत. सदर दोन्ही गावे तालुका मुख्यालये असून येथे केवळ बसेस थांबतात व आपल्या गंतव्याकडे निघून जातात. मात्र बस स्थानकांअभावी प्रवाशांची मात्र कुचंबना होते. सालेकसा व सडक-अर्जुनीला तालुका बणूण ३० पेक्षा अधिक्ष वर्षांचा कालावधी लोटला. परंतु अद्यापही सदर दोन्ही तालुका मुख्यालये बस स्थानकांपासून वंचित आहेत. दोन्ही ठिकाणी बस स्थानक बणविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परंतु यश मिळू शकले नाही. बस स्थानकांसाठी जागा उपलब्ध न होणे हे यामागील प्रमुख कारण आहे. मागील काही दिवसांपूर्वी सडक-अर्जुनीच्या नगर पंचायतच्या अध्यक्ष रीता लांजेवार यांनी एक प्रस्ताव राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराला पाठविला होता. या प्रस्तावात लांजेवार यांनी बस स्थानकासाठी आवश्यक जागा नगर पंचायतच्या वतीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. तसेच सालेकसा येथे एका व्यक्तीने आपल्या मालकीची जागा बस स्थानकासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव तयार करून राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई कार्यालयास पाठविण्यात आले आहेत. आता पुढील प्रक्रिया कुठे रखडली आहे, हे गुलदस्त्यात आहे. याबाबत राज्य परिवहन महामंडळ सकारात्मक निर्णय घेईल, असे सांगण्यात आले होते. असे झाले तर सालेकसा व सडक-अर्जुनी येथे बस स्थानकांची सुविधा उपलब्ध होवू शकेल. जर या तालुका मुख्यालयांमध्ये बस स्थानकांचे निर्माण झाले तर तेथील नागरिकांना प्रवासाची चांगली सुविधा उपलब्ध होईल व दिलासा मिळेल. आगार व्यवस्थापकांचा ‘नो रिस्पॉन्स’ सदर प्रकरणाची पुढील कार्यवाही कुठपर्यंत पोहोचली, याबाबत गोंदियाचे आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यांना मोबाईल कॉल रिसिव्ह करण्याची एलर्जी आहे काय? असा प्रश्न त्यांच्या धोरणामुळे निर्माण होतो. यापूर्वीसुद्धा अनेकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ‘नो रिस्पान्स’मुळे माहिती मिळू शकली नाही.
दोन तालुक्यांना स्थानकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2017 2:02 AM