आमगाव : तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात वर्षाला सुमारे ७० हजार रुग्ण उपचार घेतात. या रुग्णालयात तांत्रिकदृष्ट्या सुविधा उपलब्ध करून दिल्यास आरोग्य उपचाराला ऑक्सिजन मिळेल यात शंका नाही. करिता येथील उपचाराच्या सुविधात वाढ व्हावी यासाठी शासनाने उपजिल्हा रुग्णालयाची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी शासनाकडे केली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र तालुक्यात उत्तमप्रकारे आरोग्य सेवा देत आहे. आमगाव हे शहर छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयातून रुग्णांना उपचाराची सुविधा सहजपणे उपलब्ध करून दिली जात आहे. आमगाव शहर राज्य सीमेवर असल्यामुळे ग्राम लांजी २५ किमी., गल्लाटोला ३५ किमी., बीजेपार २५ किमी., घाटटेमनी १८ किमी., ककोडी ७५ किमी. अंतरावर असून ग्रामीण रुग्णालय त्यांना उपचारासाठी सुविधायुक्त ठरते.
ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी अतिदुर्गम भागातील रुग्णांची नेहमीच वर्दळ दिसून येते. प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला सुमारे ४५ हजार व ग्रामीण रुग्णालयात सुमारे ३० हजार रुग्ण उपचारासाठी येतात. सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयात ३० बेड तर प्राथमिक आरोग्य केंद्रात १० बेड मंजूर आहे. प्रसूतीकरिता विशेष महत्त्व दिले जात आहे. सामान्य जनतेला शासकीय रुग्णालयात उपचार मिळविण्यासाठी शासनाच्या विविध योजनाही लाभाच्या ठरतात. यात रुग्णांची खासगीत होणारी लूट थांबविण्यासाठी एक मोठी मदत मिळण्यास उपयोगी ठरू शकते. यासाठी रुग्णालयाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. करिता शासनाने येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु अद्यापही शासनाकडून हिरवा कंदील मिळाला नाही. राज्य शासनाने उपजिल्हा रुग्णालय मंजूर करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे.
---------------------
रुग्णसेवेला मदत होईल
अतिदुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांना तातडीच्या उपचाराची सुविधा मिळाल्यास गंभीर आजारावर उपचार करणे सोईस्कर होईल. तर अनेकांना वेळेवर उपचार मिळून त्यांचा मृत्यू टाळता येतो. उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले तर रुग्णसेवेत मदत होईल, अशी प्रतिक्रिया डॉ. अरविंद खोब्रागडे यांनी व्यक्त केली.
-------------------
रुग्ण व लोकसंख्येच्या प्रमाणात सेवा आवश्यक
वाढती लोकसंख्या व रुग्णसंख्या पाहता नागरिकांना वाढीव उपचार सेवा मिळणे आवश्यक आहे. शासनाने सेवा मंजूर केल्यास रुग्णांना उपचारासाठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया डॉ. ताम्रध्वज नागपुरे यांनी दिली.