पुढाऱ्यांची नुसतीच घोषणा : सरकारदरबारी पदाधिकाऱ्यांचे प्रयत्नआमगाव : आमगाव, सालेकसा व देवरी या तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना रुग्णालयाची जलद सेवा मिळावी यासाठी आमगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा करताना नागरिकांची दमछाक झाली आहे. पुढारी केवळ कोरड्या घोषणा करून मोकळे झाले असले तरी प्रत्यक्षात काहीच हालचाली नाही. दुसरीकडे आता शिवसेना-भाजपातील काही पुढाऱ्यांनी त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली आहे. आदिवासी अतिदुर्गम भागातील नागरिकांना उत्तम व जलद रुग्णसेवा मिळावी यासाठी शासनाने विविध धोरण राबविले आहेत. परंतु रुग्णांना जलद रुग्णसेवा देण्यासाठी जिल्हा रुग्णालयाशिवाय पर्याय दुसरीकडे नाही. अशा अवस्थेत रुग्णांना रुग्णसेवेसाठी १०० ते १५० किलोमीटरचा प्रवास करून उपचारासाठी जिल्हा रूग्णालय किंवा मेडिकल गाठावे लागते. या प्रवासात रुग्णांना तातडीची रुग्णसेवा मिळत नसल्याने अनेक रुग्णांना मृत्यूने कवटाळले आहे. आमगाव तालुक्यातील घाटटेमनी, सालेकसा तालुक्यातील चांदसूरज तर देवरी तालुक्यातील ककोडी अशा लांब टप्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल परिक्षेत्रातील रुग्णांंना तातडीची रुग्णसेवा आजही मिळत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. सदर तिन्ही तालुक्यात रुग्णसेवा जलद गतीने मिळावी यासाठी आमगाव येथील रुग्णालयातील प्रशस्त इमारत व रुग्णसेवेसाठी मध्य भाग ठरत असल्याने नागरिकांनी आमगाव येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी शासनाकडे केली आहे. या मागणीकडे लक्ष देवून शासनाने निर्णय घ्यावे व रुग्णसेवा उपलब्ध करावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. यात सत्ता पक्षाच्या जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी हात घातला. आमगाव येथे उपजिल्हा रुग्णालय होणार, अशी संयुक्त बैठकीत घोेषणा केली. उपजिल्हा रुग्णालयाचा आदेश शासनस्तरावरून लवकर निघावा यासाठी पुढाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा सादर केला असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
आमगाव परिसरातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2016 1:45 AM