गोंदिया : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय तसेच समाजातील प्रलंबित समस्या या मुख्य मागण्यांना घेवून सर्व ओबीसी संघटनांच्यावतीने सोमवारी (दि.१८) सकाळी ११:३० वाजता स्थानिक प्रशासकीय इमारतीसमोर जऩआक्रोश आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी ओबीसी बांधवांनी उठ ओबीसी जागा हो अन्याय विरोधातील लढ्याचा धागा हो अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे हा परिसर दणाणून गेला होता. ओबीसींच्या जनआक्रोश मोर्चामुळे शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. अनेेक वर्षाच्या संघर्षानंतर व ओबीसी संघटनाच्या सातत्याने करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे हजारोच्या संंख्येने उतरलेल्या ओबीसी समुदायानेही सरकारला आम्ही आता जागे झालो असा इशाराच जणू काही या जनआक्रोश मोर्च्यातून दिल्याचे चित्र होते.
या जन आक्रोश मोर्चाचे ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी केले. फूलचूर येथून गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी, सालेकसा, गोरेगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील हजारो ओबीसी पदयात्रा व मोटारसायकल रॅलीने जयस्तंभ चौकाकडे रवाना झाले. यामुळे शहरातील रस्त्यांवर ओबीसींच्या पिवळ्या झेंड्यांनी शहर ओबीसीमय झाल्याचे चित्र होते. या मोर्च्यामुळे मात्र जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनांचीही तारांबळ उडाली होती. जन आक्रोश सभेचे संचालन सुनील पटले यांनी केले.
या होत्या प्रमुख मागण्यामागील काही वर्षांपासून आरक्षणाला घेवून राज्य शासन गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात निघणार्या विविध पदभरत्यांमध्ये ओबीसीचे आरक्षणावर गदा आणण्यात येत आहे. शिवाय ओबीसींची जनगणना करण्यात यावी, ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाची घुसखोरी थांबविण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यात यावे, जिल्ह्यातील पोलिस पाटील पदभरतीतील ओबीसींवरील अन्याय दूर करण्यात यावे या मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला.
मोर्च्यात या संघटनांनी घेतला सहभाग
आंदोलनात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, ओबीसी अधिकार मंच , ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघ, महात्मा फुले समता परिषद, ओबीसी अधिकार मंच, युवा ग्रॅज्युएट फोरम, संविधान मैत्री संघ, अवामे मुस्लिम समाज गोंदिया तसेच आदिवासी, युवा बहुजन मंच, एसबीसी, एनटी संघटनांनी, आदिवासी संंघटनासह ओबीसीतील विविध संघटनाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.