गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्राचे उद्घाटन सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, अद्यापही धान खरेदीला सुरुवात झाली नसल्याने शेतकऱ्यांची ओरड वाढली आहे. मात्र, दुसरीकडे काही संस्थांची गोदामे फुल्ल होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या गोदामातील धान नेमके कुणाचे असा सवाल निर्माण झाला आहे.
आदिवासी विकास महामंडळाने जोपर्यंत गोदामे उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत धान खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महामंडळाच्या केंद्रावर सध्या शुकशुकाट आहे, तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदी करण्याला परवानगी दिली असली तरी गोदामातील धानाची अद्याप उचल झाली नसल्याने संस्थांनी धान खरेदीला प्रत्यक्षात सुरुवात केली नाही. आतापर्यंत ४० धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात धान खरेदी किती झाली, असे फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते खरेदीला सुरुवात झाली नसल्याचे सांगत आहेत. यंदा काही नवीन संस्थांनासुध्दा धान खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही संस्थांकडे धान खरेदीसाठी गोदामे उपलब्ध होते. मात्र, रब्बीतील धान खरेदी करण्यापूर्वीच काही संस्थांचे गोदाम अर्ध्याहून अधिक भरली असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केली नाही. मग या गोदामातील धान नेमका कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रब्बीतील धान खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकरी गरजेपोटी व खरिपातील बी-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल दराने धानाची विक्री करीत आहेत, तर काही व्यापाऱ्यांनी धान खरेदी केंद्राशी साठगाठ करून धान खरेदी केंद्रावर पाठवित असल्याची माहिती आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून धान खरेदी न करताच गोदामे भरणे सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकाराकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे चित्र आहे.
............
धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करून काय फायदा
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत जिल्ह्यात ४०हून अधिक धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले आहे. मात्र, या खरेदी केंद्रावर धान खरेदी शून्य आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यापेक्षा प्रत्यक्षात खरेदीला कशी सुरुवात होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, अनेक जण केवळ खरेदी केंद्राच्या फित कापण्यातच व्यस्त आहेत.
.........
खरिपाची कामे करायची की धानाची विक्री?
खरीप हंगामाला सुरुवात झाली तरी यंदा रब्बीतील धान खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे धान ठेवण्याचीसुध्दा अडचण निर्माण झाली असून, खरिपातील कामे करायची की रब्बीतील धानाची विक्री करण्यासाठी जायचे, असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
......
नोंदणीची मुदत संपली आता खरेदीची संपणार
रब्बी हंगामातील धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत ३१ मेपर्यंत होती. तीसुध्दा आता संपली आहे, तर ३० जूनपर्यंत रब्बीतील धान खरेदी केली जाते. सध्याची स्थिती पाहता अजूनही धान खरेदीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे यंदा रब्बीतील धान खरेदीचे बारा वाजणार असल्याचे चित्र आहे.