अर्जुनी मोरगाव : रबी हंगामातील धानपिकाची मळणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांची मळणी होऊन धान विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र, अद्याप धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडे कवडीमोल भावात विक्री करण्याचे शेतकऱ्यांसमोर संकट उद्भवले आहे. केंद्र सुरू न झाल्यास २० मे रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
रबी हंगामातील धानपीक निघत आहे. काही शेतकऱ्यांच्या धानाची मळणी होऊन विक्रीसाठी सज्ज आहे. मात्र, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नाहीत. खरीप हंगामाची शेतकऱ्यांना तयारी करायची आहे. कोरोनाचे संकट असल्याने पदरमोड करून शिल्लक असलेला पैसा खर्च झाला आहे. अशा विपरीत परिस्थितीत व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दरात धान विक्री करण्याची वेळ आली आहे.
धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासकीय यंत्रणेला ११ मे रोजी पत्र देऊन दोन दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र, केंद्र सुरू झाले नाही. १९ मेपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास २० मे रोजी नवेगावबांधच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा बाराभाटी येथील किशोर बेलखोडे व शेतकऱ्यांनी दिला आहे.