गोंदिया : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जीव मुठीत घेऊन रुग्णांची सेवा करीत आहेत. मात्र त्यांना मिळणारे मासिक वेतन वेेळेवर मिळत नाही. याशिवाय इतर समस्याही कायम आहेत. एकंदरीत जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत अडवणुकीचे धोरण अवलंबित असल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी मागण्यांची पूर्तता न झाल्यास १५ मेपासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मागील पाच वर्षांपासूनची जीपीएफ खात्यात कपात झालेली रक्कम दिसत नाही. जीपीएफ स्लिप दिली जात नाही. मागील एक वर्षापासून कालबद्ध पदोन्नती प्रकरणाकरिता सेवापुस्तिका जिल्हास्तरावर जमा असून जि. प. आरोग्य विभागाकडून वरिष्ठ पातळीवर मंजुरीकरिता पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकस्तरावर सेवापुस्तिका उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवरील क्लेमसुद्धा अडकलेले आहेत. तसेच सन २०२०-२१ चे बिंदू नामावली तयार करण्याकरिता प्रशासनाला पाठपुरावा करण्यात येते. मागितलेले सर्व कागदपत्रे कर्मचाऱ्यांनी जमा केलेले आहेत. तरीपण नागपूर विभागाच्या आयुक्तस्तरावरून मंजूर करण्यासाठी कोणतीही कार्यवाही आरोग्य विभागाकडून झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती होतील किंवा नाही, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांच्या अनुषंगाने जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याबाबत जि. प. प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
...........
या आहेत प्रमुख मागण्या
आरोग्य कर्मचारी हे कोरोनायोद्धा म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण अधिक प्रमाणात होत आहे. वेळेवर बेड उपलब्ध न झाल्याने दोन आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात यावे. जिल्हास्तरावर ऑक्सिजनसह ५० बेड स्वतंत्ररीत्या वेळेवर उपलब्ध होण्याकरिता वॉर्ड निर्माण करण्यात यावे. या अनुषंगाने मागण्या करण्यात आल्या आहेत. परंतु प्रशासनाने या मागण्यांकडेसुद्धा दुर्लक्ष केले आहे. पदोन्नतीच्या सेवापुस्तिका आहेत त्या पातळीवरून ८ दिवसात निकाली काढण्यात यावे, आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आरोग कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.