लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यात नवेगावबांध व इटियाडोह हे दोन मोठे जलाशय आहेत. या दोन जलाशयातील पाण्याची पातळी खालावली आहे. या जलाशयांवर चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यावर येत्या आठवडाभरात जलसंकट उद्भवण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.अर्जुनी मोरगाव तालुका तलावांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात लहान मोठे तब्बल ३३३ तलाव आहेत. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ११७५ मि.मि. असताना गतवर्षी ९५४ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे आधीपासूनच तलाव, बोड्या तहानलेल्याच होत्या. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सिरेगावबांध, रामपूरी, खांबी व गोठणगाव अशा चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहेत. यापैकी सिरेगावबांध व रामपूरी या नवेगावबांध तलाव तर गोठणगाव व खांबी या इटियाडोह तलावाला जोडल्या आहेत. या चारही पाणी पुरवठा योजनांद्वारे तालुक्यातील तब्बल ५४ गावांना पाणी पुरवठा होतो.या योजनांच्या मार्फतीने दररोज प्रती कुटुंब ५०० लिटर प्रमाणे सुमारे ५००० कुटुंबाना नियमितपणे पाणी पुरवठा सुरु आहे.मात्र पर्जन्यमान कमी असल्याने तलावातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे या दोन्ही तलावात पाणी पुरवठ्यासाठी तयार करण्यात आलेल्या विहिरीत कालव्याद्वारे येणारे पाणी हे येत्या चार दिवसात बंद होऊन पाणी पुरवठा योजना बंद पडतील. तालुक्यात भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. खबरदारीसाठी प्रशासनाने तातडीने कालव्याचा उपसा करणे गरजेचे आहे.जेणेकरुन चारही प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीत राहतील, असा पत्रव्यवहार जि.प.सदस्य किशोर तरोणे यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केला होता. मात्र यावर अद्यापही कुठल्याच उपाययोजना झाल्या नाहीत. येत्या चार दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर भिषण पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती आहे.२००७ मध्ये या पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या आहेत. पहिल्यांदाच एवढी भयावह परिस्थिती अनुभवयास येत आहे. शुक्रवारी बिडटोला व सावरटोला येथे केवळ एक दिवस योजनेचे पाणी बंद होते. तेव्हा गावकऱ्यांनी अक्षरश: बैलबंडी व ट्रॅक्टर लावून शेतातून पाणी आणले. पाणी पुरवठा योजना बंद पडली तर अर्जुनी मोरगाव येथे अभूतपूर्व जलसंकट उदभवू शकते.नळ योजना सुरू असतानाही येथे काही भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो.येथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी पुरवठा झाला नाही तर जलसंकटाचा सामना करावा लागणार हे निश्चित.- किशोर तरोणे, जि.प. सदस्य
पाणी पुरवठा योजनांवर जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 9:12 PM
तालुक्यात नवेगावबांध व इटियाडोह हे दोन मोठे जलाशय आहेत. या दोन जलाशयातील पाण्याची पातळी खालावली आहे. या जलाशयांवर चार प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यावर येत्या आठवडाभरात जलसंकट उद्भवण्याची दाट शक्यता आहे.
ठळक मुद्देनवेगावबांध व इटियाडोह रिकामे । जलाशयातील पाण्याची पातळी खालावली