गोंदिया : आपल्या वसुंधरेला हिरवेगार ठेवण्यासाठी एक पाऊल पर्यावरणासाठी या उपक्रमांतर्गत सुमन बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेने पक्ष्यांसाठी पाणपोई हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
वातावरणातील बदलामुळे मार्च महिन्याच्या उन्हाची तीव्रता जाणवू लागली. आपल्या संरक्षणासाठी उन्हापासून बचाव करण्यासाठी पशू, पक्षी, कीटक, मानव सतत प्रयत्न करीत असतो. संस्थेतर्फे जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जवळपास ५०० मातीची भांडी पक्ष्यांसाठी लावण्याचे कार्य सुरू केले आहे. कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे बरेच उपक्रम अगदी थोडक्यात आटोपली जात आहेत. त्याच अनुषंगाने संस्थेतर्फे शहरातील काही सामाजिक संस्था, शाळा, विद्यार्थी तसेच कॉलनी-कॉलनीत याचे वाटप करून ते लावण्याचे आव्हान करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात उत्तमराव पाटील वन उद्यान कुडवा गोंदिया येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने करण्यात आली. या उपक्रमासाठी विभागीय वन अधिकारी अनंत तारसेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एन. साबळे, बल्ले यांनी सहकार्य केले. या उद्यानात जवळपास १०० मातीची भांडी लावण्यात आली. पर्यावरणाचा व आरोग्याचा संदेश देणारी जेसीआय क्लबचे रवी सपाटे, मंजू कटरे, विजय येडे, संजय खटवानी, साहील बखानी, शिव भांडारकर व सायकलिंग समूहाचे अनेक लोक उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत मोठ्या उत्साहाने चमूने मातीची भांडी ठेवली. पर्यावरणीय उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येईल, असे मत संस्थाध्यक्ष वर्षा भांडारकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी ज्योती, सुशीला कोठेवार, अश्वीनी फाये व नंदिनी भांडारकर यांनी सहकार्य केले.