गोंदिया : रविवारपासून बरसत असलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदी झाले आहेत. हा रिमझिम पाऊस शेतीसाठी जरी फायदेशीर असला तरीही सिंचनाच्या दृष्टीने जलसंचय होण्यासाठी त्याचा फायदा दिसून येत नाही. दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक रितेच असल्याची माहिती मिळाली आहे. १ जून ते ४ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५४८.४ मिमी पाऊस पडला असून याची टक्केवारी ७३.६ एवढी आहे. सध्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात एकूण ५१.४ मिमी पाऊस पडत असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. रिमझिम पावसामुळे थोड्या प्रमाणात पिकांना लाभ मिळणार असला तरी जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात जलसाठा झालेला नाही.इटियाडोह जलाशयात केवळ १४.३६ टक्के पाणी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेत तेथे ४६.८४ टक्के जलसाठा होता. सिरपूर जलाशयात १६.२१ टक्के जलसाठा आहे. तर मागील वर्षी ५८.८२ टक्के जलसाठा होता. विशेष म्हणजे सिरपूर जलाशयातून मागील चार दिवसांपासून सतत पूजारीटोला जलाशयासाठी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पूजारीटोला धरणाच्या जलसाठ्यात वाढ होवून ४३.१६ टक्के झाले आहे. मागील वर्षी तेथे ५१.९६ टक्के जलसाठा होता. उल्लेखनिय म्हणजे पूजारीटोला जलाशयासाठी जेवढे पाणी सिरपूरमधून सोडण्यात आले तेवढ्या प्रमाणात पाणी तेथे पोहचले नसून जवळील नाल्यांमध्येही पर्याप्त पाणीसाठा झालेला आहे. कालीसरार जलाशयात आतासुद्धा १५.३० टक्के जलसाठ्याची स्थिती आहे. मागील वर्षी येथे ५६ टक्के जलसाठा झाला होता.याशिवाय जिल्ह्यातील एकूण ६८ जलाशयांत (तलाव) केवळ २३.६७ टक्केच जलसाठा आहे. मागील वर्षी ३ आॅगस्टपर्यंत ६७.७१ टक्के जलसंग्रह त्यांत झाला होता. यंदा पावसाळ्याचा अर्ध्याधिक काळ आता लोटला आहे. असे असतानाही दमदार पावसाअभावी बोपाबोडी, भिवखिडकी, चान्नाबाक्टी, धाबेटेकडी, कोसबीबाकी व पळसगाव (सौंदड) येथील जुन्या मालगुजारी तलावांची स्थिती आताही अत्यंत दयनिय आहे. या तलावांचा जलस्तर आतासुद्धा लघुत्तम पाणीस्तराच्या खालीच आहे. सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, आतापर्यंत या तलावांत एक टक्केसुद्धा पाण्याचा संग्रह झालेला नाही. प्राचीन काळात मालगुजारी तलाव सिंचनासाठी एक उत्तम साधन होते. (प्रतिनिधी)मध्यम प्रकल्पांत २५.६७ टक्के पाणीजिल्ह्यात मध्यम प्रकल्पाचे १० जलाशय आहेत. सर्वांमध्ये २५.६७ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी याच तारखेत या जलाशयांत ७६.८० टक्के जलसाठा होता. लघु प्रकल्पाच्या २० तलावांमध्ये १९.२६ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी ३ आॅगस्ट पर्यंत यांत ५७.५९ टक्के जलसाठा होता. माजी मालगुजारी तलावांची स्थितीसुद्धा अशीच आहे. एकूण ३८ तलावांमध्ये २७.३७ टक्के जलसाठा झालेला आहे. मागील वर्षी या तलावांमध्ये याच तारखेला ५६.२६ टक्के जल संग्रह झालेला होता.
जिल्ह्यातील जलस्रोत रितेच
By admin | Published: August 05, 2015 1:51 AM