हॉटेल मालकाचा संकल्प : लोकमतच्या जलमित्र अभियानाला वाढता प्रतिसादगोंदिया : आज पाणी वाया जाईल तर उद्या तहानेने व्याकुळ होऊन जीव जाईल. यासाठी पाणी वाचविण्याचा संदेश देणाऱ्या लोकमतच्या मोहिमेला गोंदियात सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. त्याचाच एक परिणाम म्हणून गोंदियातील हॉटेल पॅसिफिकच्या संचालकांनी पावसाचे हॉटेल परिसरात पडणारे पाणी जमिनीत मुरविण्याचा (रेन वॉटर हार्वेस्टींग) संकल्प केला आहे. हॉटेलच्या छतावर पडणारे पाणी सरळ विहीरीत सोडण्याची व्यवस्था ते करीत आहेत.सतत होणाऱ्या वृक्षतोडीमुळे अवर्षण होत आहे. त्यातच पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी शासनाकडूनही पुढाकार घेतला जात आहे. मात्र लोकांमध्ये पाणी बचतीसाठी अजूनही पाहीजे त्या प्रमाणात जनजागृती नसल्यामुळे पावसाळ्यात धो-धो करीत बरसणारे पाणी नदी नाल्याच्यांच्या माध्यमातून वाहून जाते. त्या पाण्याला जमिनीत मुरवल्या जात नसल्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आपली छोटीशी मदत भविष्यात मोलाची ठरणार, जे जाणून पॅसिफीक हॉटेलचे संचालक झवेर चावडा व राजेश चावडा यावर्षी पावसाचे पाणी जमीनीत मुरविण्यासाठी व्यवस्था करीत आहेत. त्यांच्या हॉटेलचे ५००० स्केअर फूट छत आहे. त्यावर पडणारे पाणी पाईपच्या माध्यमातून मागच्या भागात असलेल्या विहीरीत सोडले जाईल, अशी व्यवस्था केली आहे. यावर्षी पाण्याचा अपव्यय होणार नाही अशी काळजी त्यांनी घेतली आहे. या पद्धतीने वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी फारसा खर्च नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. छताच्या मागच्या भागात विहीर असल्याने छताच्या पाईपला एक पाईप जोडून छताचे ते पाणी सरळ विहीरीत टाकले जाणार आहे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार पाहून परिसरातील लोक व मित्रमंडळींचा तसाच प्रयोग करण्याचा विचार आहे. (तालुका प्रतिनिधी)२०० रोपट्यांचेही संवर्धनपाण्याबरोबर वृक्ष बचाव ही संकल्पना राजेश चावडा यांनी समोर आणून मित्र मंडळींच्या माध्यमातून त्यांनी रेलटोली परिसरात २०० कडुनिंबाची झाडे रस्त्यालगत पाच सहा वर्षापूर्वी लावली होती. ती झाडे आता मोठी झाली असून आता मोठ्या प्रमाणात सावली देत आहेत.खर्चाबरोबर बचतीचा मार्गपॅसिफीक हॉटेलमध्ये दररोज हजारो लीटर पाणी वापरले जाते. वर्षभरात वापरण्यात येणारे पाणी पावसाळ्याच्या दोन महिन्यात बचत करता यावे याच उद्देशातून त्यांनी पाणी वाचविण्याची सुरूवात केली आहे. आपल्याबरोबर इतरांनीही हा प्रयोग करावा यासाठी त्यांनी जल बचावचा संदेश देणारे पत्रक छापण्यास दिले आहेत. ते पत्रक आल्यावर शहरात वाटप करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाण्याची वाढती टंचाई पाहून प्रत्येक नागरिकांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ज्यांच्या घराच्या छताचे पाणी सहजरित्या विहीरीत टाकण्यात येते त्यांनी ते पाणी विहीरीत सोडण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आपल्या घराचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी पाच फुटाचा चौरस व खोल खड्डा खोदावा, ज्यामुळे पाण्याला जमिनीत मुरवता येईल.- झवेर चावडा संचालक, पॅसिफीक हॉटेल गोंदिया
इमारतीच्या छतावरचे पाणी जमिनीत मुरविणार
By admin | Published: May 24, 2016 1:51 AM