बाघ व इटियाडोह प्रकल्पातून सिंचन : पाणी सोडल्याची चौथी पाळी कपिल केकत गोंदिया रबीच्या हंगामातील पिकांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाने यंदा ११ हजार ९९० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केल्याची माहिती आहे. अशात आता विभागाकडून पिकांसाठी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत विभागाने चौथी पाळी गाठली असून इटियाडोह व पूजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. पिकांना पाणी मिळत असल्यामुळे रबीचे उत्पादन चांगले निघणार असल्याचा अंदाज लावता येत आहे. जिल्ह्याला धानाचे कोठार अशी साजूक उपमा देण्यात आली आहे. वास्तवीक जिल्ह्यातील प्रमुख पीकही धानच आहे. मात्र बदलत्या काळानुरूप निसर्गाचा लहरीपणा वाढला असून धानाच्या या कोठारात आता धानालाच ग्रहण लागू लागले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत चालले असून शेतीला फटका बसतच चालला आहे. परिणामी शेतकरी दारिद्रयात झोकला जात असतानाच धानाचे उत्पादनही घटत चालले आहे. यात धानच काय सर्वच शेती नेस्तनाबूत होऊ लागल्याचे भकास वास्तव आज जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती करीत आहेत. मात्र पाऊस आपला रंग दाखवून त्यांचे जीवन बेरंग करीत आहे. परिणामी शेती महागडी होऊ लागली असून शेतकऱ्यांचा निसर्गावरील भरवसा उठू लागला आहे. खरिपातही पावसाने आपला रंग दाखविला मात्र परतीच्या पावसाने चमत्कार केल्याने शेतकरी कसा तरी उभा राहिला. त्यात पाटबंधारे विभागाने सिंचनाची सोय करून दिल्याने कितीतरी शेतकऱ्यांचे पीक बचावले. पाटबंधारे विभागच देव बनून शेतकऱ्यांसाठी धावून आल्याचे दिसून आले व नेहमी विभागाकडून सिंचनाची सोय केली जाते. याचेच फलीत आहे की, जिल्ह्यातील शेतकरी आजही पावसाच्या लहरीपणावर नव्हे तर पाटबंधारे विभागाच्या भरवशावर आपली शेती करीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या या विश्वासाला लक्षात घेत पाटबंधारे विभागाने यंदाही रबी हंगामासाठी ११ हजार ९९० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यात बाघ प्रकल्पातून चार हजार ६० हेक्टर क्षेत्राचे तर इटियाडोह प्रकल्पातून सात हजार ९३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून या दोन्ही प्रकल्पांतून सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात १ जानेवारीपासून इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. तर १६ जानेवारीपासून पूजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. सिंचनासाठी पाण्याच्या सुमारे ११ पाळ््या द्याव्या लागतात. १०-१२ दिवस सतत पाणी सुरू ठेवतात व त्यानंतर सुमारे ५-६ दिवस बंद केले जाते त्याला पाळी म्हणतात. त्यानुसार सध्या चौथी पाळी सुरू असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या कालव्यांना पाणी सोडले जात आहे. पिकांना यंदा चांगले पाणी मिळाले आहे. त्यामुळे रबीचा हंगाम चांगला जाणार असल्याचेही दिसून येत आहे. इटियाडोहचे ६७ तर पूजारीटोलाचे ४३ दलघमी पाणी सोडले रबी पिकांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. शिवाय पाटबंधारे विभागाने १ जानेवारीपासूनच पिकांना पाणी मिळावे यासाठी प्रकल्पांतून पाणी सोडण्याचे काम सुरू केले आहे. यात १ जानेवारीपासून इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडले जात असून आतापर्यंत प्रकल्पातून ६६.८६ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. तर १६ जानेवारीपासून पूजारीटोली प्रकल्पातून पाणी सोडले जात असून आतापर्यंत ४३.२६ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिरपूचे २ गेट ०.३० मीटरने पूजारीटोलासाठी सुरू असून १६१९ क्युसेस प्रवाह आहे.
रबीसाठी पाणी पुरवठा सुरू
By admin | Published: March 05, 2017 12:11 AM