सडक-अर्जुनी : कोरोनाकाळातील वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने पाणीपुरवठा योजनेची बत्ती गुल केली आहे. परिणामी, मागील तीन दिवसांपासून कोहमारा येथील पाणीपुरवठा ठप्प पडला आहे. परिणामी, गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
नळग्राहकांनी त्यांच्याकडील पाणीपट्टीबिल भरले नाही. यामुळे त्यांच्यावर थकबाकी वाढली आहे. परिणामी, पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल भरण्यात आले नाही. नळग्राहकांना विलंबाबाबत बोलले असता कोरोनाकाळात कसे बिल येते व ते आम्ही भरायचे कसे, असे उत्तर देतात. गावात एकूण १८० नळग्राहक असून त्यातील सुमारे २५ नळग्राहकांची वसुली झाली आहे. परिणामी, योजनेचे वीजबिल भरता आले नाही. महावितरणने पाणीपुरवठा योजनेची वीजजोडणी कापली आहे. यामुळे मागील तीन दिवसांपासून कोहमाराला पाणीपुरवठा बंद आहे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांची अडचण होत आहे. नळग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकी भरल्यास पाणीपुरवठा सुरू करता येणार असल्याचे सरपंच वंदना थोटे यांनी सांगितले.